Sunday, October 11, 2015

केवढ्या झपाट्याने काळ बदलत जातो ना! आत्ता परवा परवा पर्यंत आपण काळाशी एकदम सुसंगत चाललो आहोत असं वाटत होतं. किंबहुना कॉलेज सोडून खूप वर्ष गेली आहेत असं वाटतच नव्हतं. कॉलेज, ते डेज सेलिब्रेशन्स, अर्चिज आणि ग्रीटवेल मधल्या फेऱ्या, ती फ्रेन्डशिप मागणं देणं प्रकरणं, लेक्चर्स बंक करणं हे आत्ता आत्ताच होऊन गेलं असं वाटायचं. अजूनही फर्गसन कॉलेज रोडवर फिरताना कधी अल्ट्रा मॉडर्न कपड्यातल्या, सिगरेट ओढत फिरणाऱ्या मुली बघितल्या तरी दचकून जायला नाही होत. “चिल” म्हणून पुढे जातो आपण.

मुलीच्या जन्मानंतर काही महिने बरेच पिक्चर्स बघायचे राहून गेले होते. मग एक दिवस एक गाणं चालू असताना ‘असीन’ ला ओळखलं नाही तेंव्हा अचानक आपण काळाच्या मागे पडलो कि काय असं वाटलं. किती गोष्टी ह्या काही महिन्यात बदलल्या होत्या. मुलगी व्हायच्या च्या अगोदर wide bottom jeans ची fashion होती. मुलगी झाल्यानंतर काही महिन्यांनतर मी नवीन विकत घ्यायला गेले आणि दुकानदाराला तशी jeans मागितली तर त्यावर २५% सूट आहे असं सांगितलं आणि मग कळलं कि आता नेरो bottom jeans ची fashion आलीय. शेवटी किमान पिक्चर्सचा backlog तरी भरून काढू म्हणून वेळात वेळ काढून गजनी आणि रब ने बना दी जोडी असे दोन्ही पिक्चर्स रोज १५ मिनिटे अशा हिशेबाने पूर्ण केले. शेवटी काळाशी सुसंगत राहायलाच हवं.

पण अशी कितीही धडपड केली तर काळ हा त्याच्या त्याच्या मर्जीनेच चालत असतो आणि आजकाल तर तो पळतोय असं वाटतंय. आजोबांनी काही वर्षांनी का होईना आत्त्याचा आंतरजातीय विवाह मान्य केला. कधीतरी वेगळ्या धर्माचा मित्र बघून वडील म्हणाले कि निदान आपल्या आपल्या धर्मात तरी लग्न करावीत. मागच्या पिढीतल्या लोकांनी आपापल्या मुलांची आंतरजातीय लग्ने सर्रास मान्य केली, आनंदाने लावून दिली. लिव इन रेलेशन्शीपकडे एक fact किंवा काळाची गरज म्हणून आपण बघू शकतो. शेवटी आपण स्वतःला modern समजत असतो किंबहुना आपण असतोच.

त्याहीपलीकडे जाऊन मी मध्ये गमती गमतीत म्हणाले आता पुढच्या पिढीतल्या मुलींनी केलंच लग्न (पुढची पिढी एवढ्या सर्रास लग्न करतील का हा प्रश्नच आहे !!) तर अगदी मंगळवारच्या का होईना मुलाशीच करावं म्हणजे झालं!!!

समलिंगी विवाह कायदा अमेरिकेत मागच्या महिन्यात पास झाला. भारतात कधी ना कधीतरी तो होणारच. कितीही शास्त्रोक्त विचार केला तरी अशा गोष्टी मान्य नाही होत आणि कितीही मान्य झाल्याचा आव आणला तरी जर त्याचं लोण आपल्या दारात येऊन पोचलं तर किती जण तो आव टिकवून ठेवू शकतील प्रश्नच आहे.

काळ आपल्या धावण्याच्या दोन पावले पुढेच असतो का? आपण स्वतःला कितीही modern modern म्हणवून घेतले तरी आपण आपल्या पिढीतले modern असतो बहुतेक ! त्यामुळेच generation gap ही असतेच असते! नाही का ?

इंदिरा संत




त्या भेटल्या होत्या सर्वप्रथम त्यांच्या शेला ह्या कवितेतून. शाळेतल्या प्रश्नोत्तारांमुळे आणि अगम्य शब्दांमुळे वाटणारया अवघड कवितांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अलवार, सध्या सोप्या भाषेने तेंव्हाच मनाचा ताबा घेतला होता. पण नंतर ते सगळं विसरून जायला झालं. पुन्हा कधीतरी त्या अशाच कॉलेज मधल्या पाठ्यपुस्तकातून भेटल्या. माझा मराठी विषय नव्हता पण कधीतरी मैत्रिणीच्या पुस्तकातली कुब्जाकविता वाचली आणि पुन्हा त्यांच्याविषयी जिव्हाळा दाटून आला. त्यांच्या काही काही कविता कुठून कुठून शोधून वाचल्या. तरीदेखील त्यांची पुस्तकं घ्यावीत आणि वाचावीत असं काही प्रखरपणे वाटलं नाही. त्याला कारणही होतं ते म्हणजे नुकतंच काहीतरी लिहायला सुरुवात केली होती. तेंव्हा उगीचच असं वाटायचं कि कोणाचं काही फार वाचलं कि आपण अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याप्रमाणे लिहायला लागू.

अशी खूप वर्ष गेली. एमपीएससी चा अभ्यास करत होते आणि interview चा call आला. फोर्म मध्ये स्वतःविषयी, छंदांविषयी  माहिती लिहायची होती. कविता लिहिते तर लिहिलं होतं. आणि आवडता कवी लिहायचं होतं.  स्वाभाविकच तरल मनाच्या इंदिरा संत सगळ्यात आधी आठवल्या. आता त्यांच्या तुरळक कवितांवर निभाव लागणार नव्हता म्हणून त्यांच्या कविता वाचायला सुरुवात केली. आणि त्यांच्यामध्ये गुंतायला झालं. कुठलाही अविर्भाव नसणाऱ्या, प्रभाव नसणाऱ्या, त्यांचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या आरशासारख्या लखलखीत, स्वच्छ, पारदर्शी अशा त्यांच्या हळव्या कविता. बाकी अभ्यास राहिला बाजूला आणि इंदिरा संत ह्यांच्या कवितांनी मनावर गारुड केलं.

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळीम्हणत सखा घरी येईपर्यंत पावसाला थांब म्हणून विनावणार्या, हरवणार्या बहुल्यांबरोबर स्वतःला शोधत शोधत माझ्यातल्या मी हरवल्या म्हणून हळव्या होणार्या, व्रत कठोर हे असेच हे असेच चालणार म्हणून मनाला समजावणार्या त्यांच्या अनेक अनेक कविता हळव्या, गहिर्या, उत्कट प्रेमाच्या, निसर्ग प्रतीके ओतप्रोत भरलेल्या, निसर्गाशी एकरूप होणाऱ्या, तन्मय होणार्या, रंग, सुगंध, आवाज, स्पर्श सगळ्या जाणीवा तरल ठेवून शब्दातून व्यक्त होणार्या त्यांच्या कविता. मुळातच हळवेपण आणि त्यात अकाली पतीनिधन. त्यांच्या कविता साध्यासुध्या रोजच्या उपमांतूनही अजूनच अंतर्मुख होत गेल्या,  स्वतःचा शोध घेत गेल्या, तरी वेळोवेळी सामाजिक भान राखत गेल्या.

स्त्रीची गहिरी उदासी, तिचं चिरंतन दुःख,  तिचा अत्मवेल्हाळपणा, तिच्या हरवून टाकणाऱ्या आठवणी, तिचं उत्कट प्रेम, तिचा चिरविरह,  बरोबरीने तिची बदलती सामाजिक भूमिका ह्या सगळ्याला स्पर्श करत गेल्या.

एका कवितेत उंदरांच्या चुईमूइला वैतागून पिंजरे लावा, चाप लावा असं कुणी म्हटलं तर त्यांच्या हळव्या मनाला उंदरांच्यादेखील लोभस माना, नाजूक पाय, धीटुकले डोळे, मितुकले कान आठवतात आणि शेवटी म्हणतात छे नको, असू दे, राहू दे. आमचा - तसाच त्यांचाही संसार राहू दे. 

संसाराचं स्वप्न अर्ध्यावर मोडलं तेंव्हा लिहून गेल्या तिचं स्वप्न चारचौघींसारखं....... पण ते पडण्यापुर्वीच तिला जाग आली आणि मग कधी झोप लागलीच नाही.तेंव्हा  सुन्न व्हायला होतं.

समान्य स्त्रीचं एवढंसच स्वप्न असतं पण अनुभवातून प्रगल्भता लाभलेली स्त्री एक वेगळीच उंची गाठते. त्या एवढीच धरणी हवी, दोन पावलांच्या मापाची आणि एवढेच आकाश हवे दोन अर्घ्यांएवढे म्हणतात खर्या पण पुढे किती फिरले तरी पायांना ती लागत नाही. किती पहिले तरी डोळ्यांमध्ये ते मावत नाहीम्हणतात आणि आयुष्याचं सारच सांगून जातात. भातुकली, ठिकरी, (पूर्णविराम) तेवढा तरी माझा राहू देत  म्हणत स्त्रीच्या चिरंतन दुःखाला , एकटेपणाला वाट करून देतात. ही अशी ती तशी, मध्यमवर्गी गार्गी ह्या कवितेतून सर्वसामान्य स्त्रीच्या रोजच्या प्रश्नातून त्या भेटतात. दुःखी होतात. व्यतिथ होतात.

सगळ्यांप्रति तरल भावना असलेली स्त्री प्रियकरासाठी तर किती हळवी असेल! कधी म्हणतात -
पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते

पत्रामधून कवयित्रीला हे असं काही मिळत राहतं आणि ती देताना म्हणते -
पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.
कधी  त्याचं घरी स्वागत करताना असं करेन म्हणतात  -
सोनपायरीवर पायावर
सोनेरी किरणांचे पाणी,
दो हातांनी टाकीन स्वप्ने
तुझ्यावरून मम ओवाळोनी

आणि प्रत्यक्ष परिस्थिती सांगताना लिहितात -

स्वप्नामध्ये हे स्वागत पण ..
येशील जेंव्हा तूच खरोखर
गोंधळलेली, मीही अशी अन
हे तर माझे चंद्रमौळी घर!
उण्यापुर्या आठ दहा वर्षांचा संसार!
छोटीशी स्वप्न पण तीही डोळ्यात न येणारी किंवा स्वप्न पडण्याअगोदरच जाग आलेली. अशा परिस्थितीत एखादी स्त्री आपली उमेद हरवून बसेल, सहानुभूतीच्या आशेवर राहिल. पण ह्याही परिस्थितीत त्या आयुष्यातल्या सुंदर, मंगल मुल्यांवर निष्ठा ठेवतात.

मी म्हणजे ना झिळमिळ वारा चढणीवरचा
मी म्हणजे ना कोसळणारी सुमुद्रवीची

आणि नंतर

मी म्हणजे केरवारा, स्वैपाकपाणी
मी म्हणजे बौद्धीकांची रतीब गाळणी

ह्या स्थित्यंतरानंतरही त्या म्हणतात

तरी पण आत कुठे एक चित्र उमटून आहे :
एक लहर, एक लाट, एक ठिणगी,
गवतफूल हसते आहे.

कधीतरी रुग्णालयातल्या पांढर्या रंगाने भयभीत झाल्या, बिछाना, परिचारिका, रुग्णपात्रे, औषधाच्या गोळ्या सगळ्यांचा अलिप्त, रोगट उदास पांढरा रंग आणि त्यांना चुकवण्यासाठी मिटलेले डोळे, आणि त्याहीपलीकडे पांढरे बोगदे. पण वेळोवेळी आयुष्यातली प्रेम, मैत्री, विश्वास, श्रद्धा ह्यासारखी शाश्वत मूल्य शुभ्र प्रसन्न होऊन सकाळी सकाळी दाराच्या चौकटीत सावरायला आली, त्यांनी पांढरयाशुभ्र सोनटक्क्याच्या फुलांची ओंजळ उशागातीला रिकामी केली आणि कवयित्री जाणीवेत आली.


त्यांची आणखी एक कविता मला प्रचंड आवडते. खरंतर ती अगदी उघड उघड प्रियकराच्या येण्याजाण्यावर लिहिली आहे. पण मी ती एक दुर्दम्य आशावादी कविता म्हणून घेते.


तो कधी येईल, न येईल
कधी भेटेल, न भेटेल
कधी लिहिल, न लिहिल
कधी आठवण काढील, न काढील
असा तो. एक अनिश्चिती…………..
बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी.
म्रूत्युसारखी.

सुखदुःखही कवयित्रीला अशीच भेटत राहिली असतील. सगळ्यांनाच अनिश्चितपणे भेटत राहतात.  त्यांची अव्याहत आवर्तने चालू राहतात.

त्या अनिश्चितीच्या ताणांच्या धाग्यात
तिचे पाय गुंतणार, काचणार……..
कोलमडणार….

स्थिरावता स्थिरावता सुखं दिसेनाशी होतात. अनाकलनीय प्रसंग घडतात, अनिश्चितपणे हे  सायकल चालू राहते आणि माणसं कोलमडून जातात.

पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली
या अस्मानापासुन त्या अस्मानापर्यंत...

पण जाणीवा जागृत असणारी माणसं ह्याही गोष्टीला सरावतात. आणि ह्या लाटांवर वाहवत न जाता त्यांचा आपल्या आनंदासाठी उपयोग करून घेतात.

अशी ती एक मुक्ता
वार्यासारखी. जीवनासारखी...

असं रसरसून आयुष्य जगल्याशिवाय एवढ्या ताकदीच्या कविता उतरत नाहीत. सुख दुःखाच्या भोवऱ्यामधून फिरता फिरता त्या बाहेर पडतात आणि त्यांच्या कवितांमधून सरतेशेवटी एक आनंदयात्री म्हणून प्रतिमा ठेवून  जातात. 

(Interview नंतर एका मार्काने क्लास वन चं सिलेक्शन चुकलं, आणि नंतरही कितीतरी गोष्टी एका एका मार्काने हुकत राहिल्या असतील! पण ह्या आणि अशासारख्या कितीतरी कविता, चित्रपट, पुस्तके ह्यांच्यामुळे पूर्णतः कोलमडून जायला नाही झालं, वेळोवेळी सावरायला झालं.  उत्तम साहित्याचा हा एक महत्वपूर्ण गुण आणि निकष मी मानते.)