Tuesday, June 28, 2016

जुवनाइल जस्टीस अॅक्ट प्रमाणे मेजोरीटी वय हे १८ वरून १६ करण्याचे बिल पास झालंय. राष्ट्रपतीची सही होण्यात काहीच अडचण येईल असं वाटत नाहीये. २००० सालापर्यंत हे वय असही सोळाच होतं. पण भारतातली दारीर्द्र्यरेषेखालील लोकसंख्या, ती मुलं, त्यांना मिळणारं शिक्षण, सुविधा आणि त्यांची सुधारण्याची शक्यता अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन ते वय तेंव्हा १८ करण्यात आलं होतं. आत्ता दिल्ली घटनेनंतर पुन्हा एकदा विषय चर्चिला गेला आणि आता ते वय पुन्हा १६ करण्यात येईल. मात्र सदर बिलामध्ये एक मेख आहे. सर्वसामान्य माणसाला हे वय सरसकट १६ केल्याच्या आनंदात राहता येणार नाही. कारण १६ ते १८ वयोगटातल्या व्यक्तीने अत्यंत हीन, घृणास्पद गुन्हा केला असल्यासच तो सज्ञान व्यक्तीप्रमाणे ट्रायल ला पात्र असेल. नाहीतर तो जुवानाइलच समजला जाईल. म्हणजे पुन्हा जास्तीजास्त ३ वर्षे सुधारगृहात राहून सुटून जाईल. ह्याचा अर्थ अगदी दिल्ली इतका घृणास्पद रेप नाही करायचा एवढच! साधा चालेल !!!!!!

खरंतर लैंगिक गुन्हे किंवा रेपसारख्या गुन्ह्यांमध्ये अशी सूट ठेवायची काहीच कारण नाही. मुळात रेप हा गुन्हाच इतका घृणास्पद आहे कि अशा सुटीची / डिस्क्लेमरची काहीच आवश्यकता नाही. पुन्हा तो तसा झाला आहे कि नाही हे हा मुद्धा आधी खालच्या कोर्टात उपस्थित केला जाईल. मग तो मुद्दा हाय कोर्टात जाईल आणि वर्षानुवर्षे केसेस चालू राहतील. एखाद्या कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार हा फक्त हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला आहे म्हणजे प्रायमरी इशू म्हणून हा गुन्हा हिनिअस आहे किंवा नाही ह्या मुद्द्यावरच प्रकरण हायकोर्टा मध्ये अडकून बसेल. पुन्हा ज्या तळागाळातील कमी वय असणाऱ्या गुन्हेगारांचा विचार करून ही सूट ठेवली आहे त्याचा त्यांना काहीच उपयोग नाही कारण अशी ‘मुलं’ हाय कोर्ट किंवा तिथले वकील कितपत नेमू शकतील आणि फी परवडू शकेल हा प्रश्नच आहे. आणि श्रीमंत लोक (फी परवडल्यामुळे) तसा अर्थ लावून घेतीलही. तरिही हे argument हे काही एखादा कायदा पास करायचे किंवा न करायचे सबळ कारण नाही हे मलाही माहित आहे.

कायदा म्हणजे logic . कोणत्याही अभ्यासाशिवाय एखादी सामान्य बुद्धी असणारी व्यक्ती सांगू शकते चोरीला काय प्रमाणात शिक्षा असू शकते आणि खुनासाठी काय असू शकते. अशाच logic चा विचार केला तर वय वर्षे सोळाखालील मुलीच्या संमतीने ठेवलेला शारीरिक संबंधही रेपच असतो. ह्याचा दुसरा अर्थ असा कि वय वर्षे सोळा पुढील मुलगी आपल्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवू शकते. ही तरतूद अशासाठी कि सोळा वयाखालील मुलगी ही तिच्या अज्ञानामुळे तिला फूस लावून असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते मात्र १६ च्या पुढे आपले भले बुरे कळण्याची तिला अक्कल येते. जर शारीरिक संबंधाबाबत मुलीच्या बाबतीत ही अक्कल १६ वयाला येते तर बळजबरी करून अशी गोष्ट करणे हा गुन्हा आहे ही अक्कल १६ वयाच्या मुलालाही logically यायलाच पाहिजे.

त्यामुळे हिनिअस क्राईम वगैरे डिस्क्लेमर्स काढून टाकून किमान लैंगिक गुन्ह्यांच्या बाबतीत तरी हे वय सरसकट १६ केलं पाहिजे.
प्रवासामध्ये खासकरून रानावनातून जंगलातून प्राण्या पक्षांचा ध्यास घेत फिरताना एक गोष्ट मी अनुभवलिये. आपण ठरवलेली गोष्ट जशीच्या तशी बघायला मिळेलच कि नाही सांगता येत नाही पण दुसराच काहीतरी आणखी चांगला अनुभव येउन जातो ; अगदी अनपेक्षित असा.

मागे कान्हा मध्य प्रदेशला गेलो होतो, जिम कॉर्बेटला गेलो होतो तेंव्हा आपण वाघ बघायला जात आहोत हि गोष्ट डोक्यात इतकी घट्ट होती कि असंख्य मोर, हरिणे , बायसन्स, एकशिंगे, कोल्हे, किंगफ़िशर्स , फ्लायकॅचर्स असे कितीतरी प्राणी पक्षी दिसल्यावर वाटलेला अनपेक्षित आनंद वेगळाच होता. कितीतरी ट्रिप्स करूनही वाघ नाही तो नाहीच दिसला पण कोणालाही फारसं न दिसणारं अस्वल मात्र अगदी जवळून दिसलं. त्या वाघाच्या पाठीमागचं चेसिंगही भन्नाट असतं.

आपल्याबरोबर निघालेल्या गाड्या त्या अफाट जंगलात दिसेनाश्या झालेल्या असतात. दुतर्फा झाडे आणि गाड्यांच्या चाकांनी केलेला दुपदरी रोडवरून ओपन जीपमधून आजूबाजूला ढिगाने दिसणारे मोर, माकडं आणि हरिणं बघत आपण निघालेलो असतो. धुकं पूर्ण विरलेलं नसतं. जंगलातून ओल्या सालीच्या झाडांचा वास येत असतो. झाडांच्या सावल्या सळसळत असतात. वेगवेगळ्या पक्षांचा आवाज कानावर पडत असतो. आपल्याबरोबरचा गाईड आपल्याला नवनवीन पक्षी दाखवत असतो. मधेच आपल्या रस्त्यावर काळवीटं , हरीणं येतात आपण थांबतो. (खरंतर त्यांच्या रस्त्यावर आपण गेलेलो असतो तरी तीच निघून जातात) थोड्या आणखी गर्द जंगलात शिरल्यावर गाईड सांगतो वाघ खासकरून इथे आढळतात म्हणून. आपण उत्सुक उत्सुक होतो. मग गाईड आपल्याला वाघाच्या पावलांचे नवे जुने ठसे दाखवतो. त्यातल्या त्याला वाटणार्या नव्या ठशांच्या मागे तो आपल्याला घेऊन जातो. झाडांवर वाघांनी घासलेल्या नखांचे ओरखडे दाखवतो आणि तो इथे आसपास असल्याची ग्वाही देतो. आपण कुजबुजत राहतो. आणि तो आपल्याला एकदम शांत करतो आणि एक आवाज ऐकायला सांगतो. तो आवाज कधी हरीणांचा किंवा माकाडांचाही असतो. गाईड सांगतो कि हे प्राणी एकमेकांना कॉल्स देताहेत. ज्या प्राण्यांना वाघ दिसतो ते इतरांना सावध करतात. खासकरून माकडं हरिणांना कायम असे कॉल्स देऊन सावध करतात. काही पक्षीही आवाज काढतात. मग आपण अशा कॉल्सच्या दिशेने जातो. कसे कोण जाणे पण वेगवेगळ्या tracks वरून फिरणाऱ्या बर्याच जीप्स तिथे येतात. आणि मग सगळ्यांना शांत राहायला सांगितलं जातं. खूप वेळ शांत बसून आत दाट झाडीत लपलेला वाघ रस्त्यावर येइलच ह्याची काही शाश्वती नसते पण त्याच्यासाठी ते थांबणं, क्वचित त्याची डरकाळी ऐकू येणं, इतर प्राण्यापक्षांचा कानोसा घेत राहणं ही मिनिटामिनिटाला उत्कंठा वाढवणारी गोष्ट असते. एका क्षणाला ती उत्कंठा शिगेला पोचते आणि बहुतांश वेळा व्याघ्र दर्शनाशिवायच परतावं लागतं. निराशा तर वाटतेच पण गेल्या गेल्या एकदाचा दिसला असता तर हि सगळी मज्जा अनुभवायला मिळाली नसती असंही वाटतं.

खूप पूर्वी एकदा भिगवणला उजनीच्या back water मध्ये हिवाळ्यात खूप स्थलांतरित पक्षी येतात ते बघायला गेलो होतो. गाडी एका बाजूला लावून चालत पाणवठ्यावर जायला निघालो. दूर दूरपर्यंत एकही पक्षी दिसत नव्हता. १०० कि. मी. प्रवास करून फक्त तेवढ्यासाठी गेलो असताना घोर निराशा होतेय का असं वाटत असतानाच दूरवरची आख्खी जमीन हलायला लागली. आणखी जवळ जवळ जातोय तर त्या पूर्ण जमिनीने आकाशात झेप घेतली आणि शेकडो कदाचित हजारो अग्निपंख (फ्लेमिंगो/रोहित) आकाशात असे फिरायला लागले कि जणू लाल केशरी ज्वालाच. उन होतं, अर्धा एकतास पक्षी बघून परतीला निघालोही. हे पक्षी फार जवळ येऊ देत नाहीत आणि तेंव्हाच्या ३ एक्स झूम कॅमेर्याने जेवढं टिपणं शक्य होतं तेवढं टिपलं.

काल गेलो होतो तेंव्हा ३६ एक्स झूम कॅमेरा होता आणि फ्लेमिंगो एकपण नव्हता. कालही उन होतंच. पण एकदा दुपारी एका वेगळ्या गावातून पाण्यापाशी गेलो, मग जरा उन कलंडल्यावर दिसतात का म्हणून खूप वेळ हॉटेलमध्ये घालवला. दुपारनंतर पुन्हा तिथे जाऊन आलो. काहीजण म्हणाले त्या पुढच्या गावामधून गेलात तर तिथे जरा बोटीतून जास्त दिसतील. पुन्हा बाहेर पडलो आणि हायवेला लागून पुन्हा पुढच्या गावातून पाण्यापाशी आलो. तिथे बरेच नावाडी बोटिंग करा म्हणून आग्रह करत होते. पलीकडच्या किनार्यावर फ्लेमिन्गोज असतात म्हणाले, शक्यता वाटत नव्हतीच पण बघुयात तर म्हणून गेलो. बोटीत बसल्या बसल्या त्याने सांगितलं कि ती पलीकडे म्हणजे ज्या बाजूने आम्ही दुपारपासून दोन चकरा मारल्या होत्या त्या बाजूने दिसतात. एव्हाना आम्हाला त्याच्या आयडिया ची चांगलीच आयडिया येउन गेली होती. ह्यावर्षी बहुतेक आपल्याकडे कमी झालेला पाउस आणि ग्लोबर वार्मिंग दोन्हीमुळे पक्षांना कमी थंडाव्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची गरज वाटत नसावी. असो बोटिंग तर बोटिंग! सुर्य मावळत होता. प्लीजंट हवा. पर्यटक नाहीत, गर्दी नाही. जलाशयाच्या मध्यभागी येउन नाव थांबवल्यावर खूप सारे सीगल्स आरडाओरडा करत अगदी जवळपर्यंत येत होते. एका बाजूला वेगवेगळी बदकं, करकोचे, geese, बरेच पक्षी डौलात हिंडत होते, बगळे ध्यानस्थ बसले होते. नावाड्याने बरोबर मासे घेतले होते आणि तो चारही बाजूंनी तो ते टाकू लागला कि आमच्या अगदी जवळ येउन ते वेगवेगळे पक्षी दंगा करत होते. मावळतीचा सोनेरी केशरी रंग आणि पक्षांचा गलका, भन्नाट अनुभव. परत निघाल्यावर आकाशातून खूप उंचावरून एक फ्लेमिन्गोजची काळी रेघ जाताना दिसली. (त्यांच्या विशिष्ठ आकारावरून ते ओळखता येतात)

हा पाठलाग मस्त असतो. किंबहुना तोच मस्त असतो. असंही लिहिलं गेलंय तेवढच आपल्या वाट्याचं असतं. पण ह्या प्रवासाची सवय झाली कि काय मिळालं हे तितकंसं काउंट करायची गरजच उरत नाही. Chasing is more important. Isn't ?
• बायका शिकल्या, नोकर्या करतात, कमावतात त्यामुळे आजकाल खूप डिवोर्सेस होताहेत.

• ह्यांना विचारून सांगते (डिस्कस करून नव्हे), ह्यांची परवानगी नाही, हे पाठवणार नाहीत

• आमच्याकडे हे चालत नाही. आमच्याकडे हे अस्सच लागतं. (मला आवडत नाही तरी)

• आमच्याकडे मला आवडते तरी अमुक अमुक गोष्ट अमुक अमुक वर्षात केली नाही कारण ह्यांना आवडत नाही. उदा. मागच्या पाच वर्षात थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघितला नाही किंवा हा हा पदार्थ केला नाही इ इ

• investment का ? थांबा ह्यांना फोन देते.

• त्याचं तसं काही नसतं तो परवानगी देतो मला काहीही करायला.

• त्यानं मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. (joke! स्वातंत्र्य कोणी द्यावं लागतं का?”)

• माहेरी हे वर्षातून एकदाच पाठवतात. (पाठवतात बापरे !!!)

• ह्यांना दोन मुलं हवी होती.

• मुलांकडे दुर्लक्ष होता कामा नये असं ह्यांना वाटतं.

एक अंतहीन यादी .........

मध्यमवर्गीय सुशिक्षित बायका जेंव्हा असं बोलतात तेंव्हा वाटतं कुठल्याही आंदोलनापेक्षा बायकांनी स्वतःच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणं आजमितीला सर्वाधिक गरजेचं आहे.
केरळच्या एका माननीयांच्या बोलण्यातल्या उल्लेखावरून जरा शोधू म्हटलं आणि ही बातमी मला समजली तेंव्हा मी आश्चर्यचकित झाले. मी पेपर नीट वाचत नाही हे मला कळून चुकलं आणि लाजच वाटली. रोहित वेमुला, जेएनयु, कन्हैय्याकुमार, अफझल गुरु ह्यांचे हक्क किंवा अगदी शनीशिंगणापूरच्या चौथर्यावर जाण्याच्या अधिकाराइतका तसा काही ह्या महिलेचा हक्क मोठा नाही पण तरी मी पेपर नीट वाचायला पाहिजेतच...

तर ही चित्रलेखा केरळ मधल्या कन्नूर जिल्ह्यातली. प्रधान मंत्री रोजगार योजनेतून तिने २००५ साली रिक्षा घेतली आणि ती पोटापाण्यासाठी स्वतः चालवायला लागली. CITU म्हणजे Centre of Indian Trade Unions जी कम्युनिस्ट पार्टीशी संलग्न अशी राष्ट्रीय संघटना आहे त्याचे नियंत्रण असलेल्या stand वर हिने आपली रिक्षा उभी करायला सुरुवात केली. आणि ती दलित असल्या कारणाने CITU ने तिला ती तिथे लावण्यास मनाई केली. तिला शिवीगाळ आणि मारहाण तर केलीच पण त्या वर्षाच्या अखेरीस तिची रिक्षा पेटवून देण्यात आली. पोलिसांनी पार्टीच्या भीतीपोटी काहीही कारवाई करण्यास असमर्थता दाखवली.

दोन वर्षांनी तिला well wishers कडून दुसरी जुनी रिक्षा चालवायला मिळाली तेंव्हाही तिच्या मुलीवर हल्ला झाला, खोट्या केसेस केल्या गेल्या, तिच्याविरुद्ध जातविषयक कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून गुन्हे नोंदवले गेले, केवळ power आहे म्हणून स्थानिक CPM ने ३०० जणांच्या जमावाचा तिच्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून पोलीस स्टेशन ला मोर्चा काढला. २०१४ मध्ये Kerala Anti-Social Activities (Prevention) Act ह्या कायद्यान्वये CPM च्या आरोपावरून तिच्या नवर्याला अटक केली गेली.

२०१५ मध्ये ह्या सगळ्या संघर्षासाठी तिने १२२ दिवस कन्नूर कलेक्टरेट बाहेर धरणं धरलं. केवळ आत्मसन्मानाने काम करता यावं ह्या एका अधिकारासाठी मागच्या ११ वर्षांच्या संघर्षा नंतर कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांकडून तिला तिच्या पुनर्वसनाची हमी आणि घरासाठी जागा मिळण्याचं आश्वासन मिळालंय खरं पण त्याची पूर्ती व्हायची ती वाट बघत आहे. मागच्या महिन्यात त्यासाठी तिला पुन्हा आंदोलन सुरु करावं लागलं आहे.

कम्युनिस्ट पार्टीविरुद्धचा तिचा संघर्ष हा –

Right to Work
Right to Dignity
Equal Protection of law
Right to equality before law
Right of Prohibition of discrimination on grounds of religion, race, caste, sex or place of birth

ह्या मुलभूत हक्कांमध्ये येतो.

पण तो तितकासा महत्वाचा नाही. तो मोदींविरुद्ध नाही. तो हिंदुत्वविरोधी नाही. त्याने प्रसिद्धी मिळत नाही. त्याने TRP वाढत नाही. शनीशिंगणापूर, शबरीमल ह्यासारख्या परंपरांवर ओरड करणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसा बराच तकलादू पण आहे.

चित्रलेखाच्या आंदोलनाचं आत्ताचं स्टेटस आपल्याला माहित नाही कारण आपण पेपर नीट वाचत नाही.

आमचे ओतूर खरेतर तिथल्या कापर्दीकेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पण तिथे अजून एक समाधी मंदिर आहे तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराजांचे ह्यांचे. कापर्दीकेश्वराच्या मंदिरापासून काही पायऱ्या चढून वर गेलं कि गोलाकार फिरणाऱ्या मांडवी नदीच्या काठावर ही महाराष्ट्रातल्या मोजक्या जिवंत समाधीपैकी एक जिवंत समाधी आहे. नेहमीच्या मंदिराप्रमाणे मंदिर आणि गाभारा असे त्याचे दोन भाग आहेत.

लहानपणी आम्ही जायचो तेंव्हा आतला गाभारा हा ग्रील दरवाजाने बंद असायचा आणि तिथे 'स्त्रियांना प्रवेश नाही' असे लिहिलेले असायचे. समाधी म्हणजे मातीने लिम्पलेला देह, खांदे, पाय असा साधारण ओळखू येईल असा गोलाकार भाग आहे. आम्ही कधी आतमध्ये जायचो नाही. वर्षातून फार फार तर एकदा गावात जायचे मग कशाला असाही विचार असायचा.

मग काही वर्षांनी तिथे दुपारी स्त्री पुरुषांचे भजन चालू असलेले दिसायचे. स्त्रियाही आत बाहेर करायच्या. त्या असतील तर आम्ही कधी आत जाऊन दर्शन घ्यायचो नसतील तर बाहेरूनच घ्यायचो. कधी कधी बायका समाधी भोवती जास्वंदीच्या फुलांची छान आरास करताना दिसायच्या. गावातल्याच बायका अगदी समाधीला स्पर्श करूनही दर्शन घेताना दिसायला लागल्या. मी सहजच आमच्या मंदिराच्या पुजारी काकूंना विचारलं तर त्या खूपच सहजतेने म्हणाल्या कि हो आता जातात बायका आतमध्येही. एवढं काही नाही... ह्याहून जास्त काही नाही. पण ती पाटी तशीच होती.

मग देवळाला रंग द्यायला काढला. आम्ही पुढच्या वर्षी गेलो तर देऊळ एकदम चकाचक आणि ती पाटीही नव्हती. रंगाच्या वेळेस काढून टाकली असणार. आम्ही सर्रास आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला लागलो. त्या जास्वंदीच्या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची आरास तिथे इतकी सुंदर करतात कि आतमध्ये जावं असं कायमच वाटायचं.

एवढ्या सहजतेने व्हायला हवं होतं सगळं.....
शिवशक्ती संगम's photo.
शिवशक्ती संगम's photo.
"घटनाकार बाबासाहेब"

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण, राज्यांचे विभाजन, सामाजिक न्याय, केवळ एकछत्री अंमल नसल्याने परकीयांच्या राजवटी आणि त्यामुळे निर्माण झालेली राष्ट्रीयत्वाच्या भावनेची गरज, ह्या सगळ्याला सांधू शकेल अशी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार व्हावी ह्यासाठी घटना समितीची स्थापना झाली. तिची पहिली सभा ९ डिसेंबर १९४६ साली होऊन डॉ. राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १७ डिसेंबर १९४६ मध्ये संविधान सभेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले गेले आणि त्यांच्या प्रभावी भाषणाने सभागृह अवाक झाले.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी नेमण्यात आलेल्या सात जणांच्या मसुदा समितीने अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची एकमताने नेमणूक केली. त्यातही बऱ्याच कारणांमुळे इतर सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे घटनेचा मसुदा करायची जबाबदारी अंतिमतः फक्त बाबासाहेबांवर पडली आणि स्वतःच्या शारीरिक दुखण्यांची तमा न बाळगता त्यांनीही ती यथार्थपणे निभावली. त्याचा प्रथम मसुदा जानेवारी १९४८ मध्ये प्रकाशित झाला. बरीच चर्चा आणि दुरुस्त्यांनंतर २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० रोजी अशा दोन टप्प्यांत संमती मिळून राज्यघटना अस्तित्वात आली.

अशा जगातल्या सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनेचे अवलोकन केले तर लक्षात येते, की ज्या विविधस्पर्शी तरतुदी बाबासाहेबांनी केल्या आहेत त्यामध्ये 'देश एक राहावा' ही सर्वोच्च भूमिका ठेवली आहे आणि त्यातच घटनेचे आणि बाबासाहेबांचे महत्त्व अधोरेखित होते. संघराज्यांच्या कामाची विभागणी, घटनेचा सर्वाधिकार, त्याच्या मूळ चौकटीला धक्का न लावता ठेवली गेलेली घटना दुरुस्तीची लवचिकता, कोर्टाचा अधिकार, शासन व न्यायव्यवस्था ह्यांचे विलगीकरण... हे लिहिताना बाबासाहेबांनी लोकशाही, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य अबाधित राहावे ह्याचा खोलवर विचार केला.

बाबासाहेबांची तेव्हा एक 'दलित नेता' अशी प्रतिमा होती. घटना मसुदा लिहिताना मात्र राष्ट्राच्या एकसंधतेला प्राधान्य देत त्यांनी घटनेमध्ये दलितांसाठी विभक्त मतदारसंघ इ. कोणतीही तरतूद केली नाही. ह्यातच त्यांची स्थितप्रज्ञता दिसून येते. मात्र घटनेत सर्वांना समान संधी तसेच, वर्ण, लिंग आणि जातीच्या पातळीवर समानता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध अधिकार, शिक्षणाचा, जगण्याचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा असे मूलभूत अधिकार सर्वांना प्रदान करून सामाजिक आणि आर्थिक न्याय स्थापन करायला त्यांनी तितकेच प्राधान्य दिलेले दिसते.

घटनेच्या सतराव्या कलमानुसार 'अस्पृश्यता आणि त्याचे पालन' हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आणि समतेच्या अधिकारानुसार सार्वजनिक ठिकाणे उदा. विहिरी, तलाव, उपहारगृहे, करमणूकगृहे, स्मशाने ह्यांचा सर्वांसाठी वापर हा मूलभूत अधिकार देण्यात आला. आर्थिक आणि सामाजिक समतेशिवाय केवळ राजकीय स्वातंत्र्याने राष्ट्रीय एकात्मता साधली जाणार नाही ह्या विचारांना त्यांनी घटनेमध्ये उत्तमरीत्या गुंफले.

घटनेच्या चौथ्या भागात राज्यांप्रती आंबेडकरांनी काही निर्देशक तत्त्वे घालून दिली ज्यामध्ये सामाजिक न्यायासंदर्भात सखोल विचार दिसून येतो. यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतनाचा हक्क, पैसा आणि उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होऊ नये अशा पद्धतीची अर्थव्यवस्था, समान संधी, काम आणि शिक्षणाचा अधिकार, निःशुल्क न्याय सहाय्यता, बालकामगारांचा शोषणविरोधी हक्क, इ. तत्त्वे राज्याला घालून दिली आहेत. समान नागरी कायद्याचाही सदर तत्त्वांत अंतर्भाव आहे. हे त्यांच्या दूरदृष्टीचेच द्योतक होते.

भाषावार प्रांतरचनेचा भावनिकदृष्ट्या विचार करत त्यांनी 'एक राज्य एक भाषा' हे सूत्र मांडले. तरीही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि मध्य प्रदेश ह्या मोठ्या राज्यांचे विभाजन करून लहान राज्ये बनवली पाहिजेत असा त्यांचा दृष्टीकोन होता. राज्याचे क्षेत्रफळ मोठे असल्यास त्याप्रमाणात अल्पसंख्य व बहुसंख्य ह्यांच्यातले प्रमाण अधिक अधिक व्यस्त होत जाते, त्यामुळे अल्पसंख्यांच्या शोषणाचे प्रमाण वाढते, असे त्यांचे मत होते. त्यामुळे लहान राज्यांची संकल्पना मांडून त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले.

काश्मीरला स्वतंत्र ओळख देणाऱ्या ३७० व्या कलमाच्या निर्मितीसाठी बाबासाहेब कधीच अनुकूल नव्हते. सदर कलम जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल ह्यांच्या संमतीने निर्माण करण्यात आले. घटनेच्या प्रीएम्बल ने भारताला 'सार्वभौम, लोकतांत्रिक, प्रजासत्ताक' असे घोषित केले ज्यामध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे वाढवलेला 'समाजवाद' हा अर्थ अंतर्भूत होताच. त्याच दुरुस्तीने समाविष्ट केलेले ‘निधर्मी’ हे वैशिष्ट्यही सदर शब्द हा घटनेमध्ये केवळ माणसांचे संबंध कथन केल्यामुळे आणि धर्म ही बाब माणूस आणि देव ह्या संदर्भातली असल्याने बाबासाहेबांना अनावश्यक वाटत होती.

भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि देश एकसंध राहावा ह्यासाठी एकहाती लिहिलेल्या राज्यघटनेचे सर्वेसर्वा शिल्पकार म्हणून भारतीय इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. देश त्यांचा कायमच ऋणी राहील !
.
रवींद्रनाथ टागोरांबद्दल लिहिलेल्या साप्ताहिक विवेक मधील  लेख.



कथाकार रवींद्रनाथ

आपल्या गीतांजली काव्यसंग्रहाने साहित्याचं नोबेल मिळवणारे पहिले भारतीय, आपल्या राष्ट्रगीताचे गीतकार, संगीतकार म्हणून आपल्याला त्यांचा विशेष अभिमान! साहित्याबरोबरच चित्र, नाटय, शिक्षण अशा सगळयाच क्षेत्रांत आपला खास ठसा उमटवणारे रवींद्रनाथ ह्यांच्या विविध पैलूंची नुसती ओळख करून घेणं हे तसं एका लेखातलं काम नाही.रवींद्रनाथ टागोर ह्यांची 8 मे रोजी 155वी जयंती. याचे औचित्य साधून केलेला हा लेखप्रपंच.

आयुष्य व्यापून टाकेल असं एक खूप मोठं जिगसॉ असावं आणि त्याचे काही तुकडे हरवून जावेत, आयुष्यभर ते सोडवायचा प्रयत्न करावा.., कधी ह्या बाजूने, कधी त्या बाजूने, कधी उलट कधी सुलट... तरीही ते लागू नये आणि त्या प्रयत्नांत रिकाम्या जागी अत्यंत सूक्ष्म भावदर्शी कल्पनारम्य तुकडे असे काही बसावेत की सगळया बाजू खऱ्या वाटाव्यात, परिपूर्ण वाटाव्यात. स्वत:च्या झालेल्या वैयक्तिक हानीतून स्त्रीमनाचा एवढया तरलतेने विचार करत कथा लिहिणारे प्रतिभावंत कथालेखक रवींद्रनाथ टागोर ह्यांची 8 मे रोजी 155वी जयंती. आपण त्यांना प्रामुख्याने ओळखतो कवी म्हणून, शांतीनिकेतनचे सर्वेसर्वा म्हणून. आपल्या गीतांजली काव्यसंग्रहाने साहित्याचं नोबेल मिळवणारे पहिले भारतीय, आपल्या राष्ट्रगीताचे गीतकार, संगीतकार म्हणून आपल्याला त्यांचा विशेष अभिमान! साहित्याबरोबरच चित्र, नाटय, शिक्षण अशा सगळयाच क्षेत्रांत आपला खास ठसा उमटवणारे रवींद्रनाथ ह्यांच्या विविध पैलूंची नुसती ओळख करून घेणं हे तसं एका लेखातलं काम नाही.

त्यांच्यातल्या कवीइतकाच त्यांच्यातला कथालेखकही तितकाच भावपूर्ण आहे. खासकरून त्यांनी लिहिलेल्या स्त्रीवादी कथेसंदर्भात तो अधिकच तरल मनाचा आहे. आधी आपण कथाकार रवींद्रनाथ ह्यांच्याशीच अपरिचित असतो. त्यातून स्त्रीवादी म्हटलं तर कोणालाही आश्चर्यच वाटेल. कोणत्याही कथेतून स्त्रीचा तथाकथित संघर्ष, तिच्यावरचे अन्याय, तिचे लढे, तिचे हक्क अशा कुठल्याही गोष्टीचं भडक चित्रीकरण न करता अत्यंत सौम्यपणे स्त्रीच्या मनाचं भावविश्व ते आपल्यापुढे उभं करतात. अगदी तिच्या प्रतिमेत शिरून. तिचं प्रेम, तिचा विरह, तिची मैत्री, मोह, द्वेष, श्रध्दा, सूड, तिचे आदर्श, तिचं स्वातंत्र्य, तिची निर्णयक्षमता... सगळं सगळं त्यांच्या कथेतून पुढे येतं आणि सुमारे एका शतकापूर्वी लिहिल्या गेलेल्या ह्या कथांतून भेटणारी कणखर स्त्री आपल्या डोळयासमोर आली की आपण अवाक होतो त्यातल्या स्त्री पात्रांमुळे आणि ज्यांनी त्या काळात तिची अशी प्रतिमा रंगवली अशा काळाच्या शेकडो पावलं पुढे असलेल्या रवींद्रनाथांच्या असामान्य प्रतिभेमुळे!

त्यांच्या कथा आजही चौकटीबाहेरचा विचार करायला लावतात. 'तीन संगी' ह्या कथासंग्रहात भेटणारी लॅबोरेटरी कथेतील सोहिनी अशीच आहे. वरवर बघायला गेलं तर उच्छृंखल आहे. आपल्या सौंदर्याचा उपयोग करून आपला स्वार्थ साधणारी. पण तिच्या नवऱ्याच्या लॅबोरेटरी संदर्भातल्या व्रताशी तिची पूर्ण निष्ठा जोडली गेली आहे, ज्या व्रताशी एकनिष्ठता राखताना आपल्या मुलीचीही पर्वा करत नाही. एकीकडे तिचं वागणं आणि दुसरीकडे तिची ही निष्ठा ह्या दोन्ही गोष्टी कथेतून पुढे आणून रवींद्रनाथ त्यातल्या नैतिकतेचा निर्णय वाचकांवर सोडून देतात.

नायकाचं प्रेम आणि वडिलांची शेवटची इच्छा ह्यामध्ये 'रविवार' या कथेतील विभाची द्विधा मन:स्थिती झालेली असली तरी प्रसंगी ती कठोर आहे आणि आपल्या विचारांशी ठाम आहे. 'अखेरचा शब्द'मध्ये, प्रेमामुळे नवीनमाधव आपल्या कर्तव्यात कसूर करतोय, त्याच्या कामात व्यत्यय येतोय, हे अचिराला जेव्हा कळतं, तेव्हा ती ठामपणे स्वत:हून दूर व्हायचा निर्णय घेते.

'पत्नीचं पत्र' ही रवींद्रनाथांनी लिहिलेली एक अफाट कथा आहे. अत्यंत देखणी आणि बुध्दिमान असलेली मृणाल जिच्या घरी 'बिंदू' नामक एक विधवा आश्रयाला येते, जिच्या आत्महत्येने मृणालच्या मनात स्त्री, तिचं संसारातलं आणि समाजातलं स्थान ह्याविषयीच्या प्रश्नांनी काहूर उठतं. मृणाल एक अशी नायिका, जी स्वत: सुखवस्तू घरातली स्त्री असूनही दुसऱ्या कोणाचं दु:ख बघून स्वत:चं वरकरणी का होईना दिसणारं सुख सोडून तत्त्वासाठी घर सोडते, नवऱ्याला पत्रातून धीटपणे सगळया गोष्टी कळवते आणि आपला मार्ग निवडते.

नातेसंबंधातला त्रिकोण ह्याविषयी रवींद्रनाथांनी कितीतरी लिहिलं. त्यांच्या 'नष्टनीड' ह्या कादंबरीवरचा चारुलता हा चित्रपटही खूप गाजला. नष्टनीडमधील चारू आपल्या कल्पनाविश्वात रमता रमता दीर अमल ह्याच्याकडे आकर्षिली जाते. 'मालंच' कथेतील आदित्यच्या आयुष्यात पूर्वायुष्यातली सवंगडी सरला हिची जबाबदारी असते. 'दुईबोन'मध्ये पत्नीच्या आजारपणामुळे शशांक आणि पत्नीची बहीण उर्मिला ह्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते.

त्या काळात असे विषय हाताळताना रवींद्रनाथ काळाच्या किती पुढे होते हे जाणवतं. नीती-अनीती, चूक-बरोबर ह्या पलीकडे जाऊन जसं आहे तसं ते स्त्रीचं चित्रीकरण करतात. तिची प्रतिष्ठा राखतात. तिच्या सर्व भावनांकडे आदराने बघतात. त्यातल्या तथाकथित कालसापेक्ष मूल्य, भावना ह्यापलीकडे जाऊन तिच्या मनाचे पैलू ते उलगडून दाखवतात. पण केवळ ह्यात त्यांचा मोठेपणा नाही. एक लेखक म्हणून स्त्रीला अशी रेखाटताना कोणतंही लेबल न लावता, व्यक्ती म्हणून ते तिचा स्वतंत्र विचार करताना दिसतात. त्यांच्या कथेतली स्त्री ही स्वतंत्र आहे; प्रसंगी ती चुकते, धडपडते, पण त्यातूनच सावरते आणि अंतिमत: योग्य निर्णय घेते. रवींद्रनाथ तिचं असं एक व्यक्तिस्वातंत्र्य जपतात. ती अबला नाही, लाचार नाही, केवळ दु:खाने गांजलेली नाही, असाहाय्य नाही. प्रसंगी सर्व सुखे हाताशी असताना ती काढता पाय घेते, बंडखोरी करते. आत्मभानाकरिता, उन्नतीकरिता ती संघर्ष करते. ती कणखर आहे. तिच्यामध्ये निर्णयक्षमता आहे. आपले निर्णय आपण घेण्याइतकी ती स्वत:ला समर्थ समजते. पुरुषांच्या मतांवर ती अवलंबून नाही.

रवींद्रनाथ फक्त इथेच थांबत नाहीत. त्यांच्या कथेतील प्रत्येक पुरुष नायक स्त्री एक व्यक्ती म्हणून स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचं स्थान देतो. तो तिच्या निर्णयाचं स्वागत करतो, ते स्वीकारतो, त्याचा आदर करतो. कोणत्याच पुरुष पात्राकडून तिच्या स्त्रीत्वाचा आणि त्याच्या स्वातंत्र्याचा धिक्कार होत नाही. तिच्या चुकांवर अपराधी भावना लादली जात नाही. कितीतरी कथांत एक मित्र, एक जिवलग म्हणून पुरुष पात्र आहे, जो तिच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावतो, मात्र तो अधिकार गाजवत नाही. 'अपरिचिता'मधील पिता हुंडयातले दागिने वरपित्याने लग्नाच्या दिवशी तोलून मागितले म्हणून लग्न मोडण्याइतका आणि नंतर देशसेवा करण्याच्या मुलीच्या निर्णयात आडवा न येणारा आहे. 'त्याग' कथेतला हेमंत लग्नानंतर पत्नीची जात कळल्यावर 'मी जातपात मानत नाही' असं वडिलांना खंबीरपणे सांगतो. बायकोला सतत मागे खेचणारा निर्झरिणीचा नवराही अखेर तिचे गुण मान्य करतो. 'नष्टनीड' कथेतील विवाहित नायिका चारू दीर अमलमध्ये गुंतते. अमलच्याही हे लक्षात येऊन तो लग्न करतो आणि परदेशी निघून जातो. त्याच्या आठवणीत शोकमग्न झालेल्या चारूचा विचार करताना रवींद्रनाथांच्या लेखणीतून तिचा नवरा भूपती विचार करतो, 'हिला असं एकही ठिकाण नाही जिथे ती आपलं मन पूर्णपणे मोकळं करू शकेल, रडू शकेल आणि हा सगळा भार सहन करत तिला सर्वसाधारण लोकांप्रमाणे, तिच्या स्वस्थ शेजारणींप्रमाणे रोजचे घरातले व्यवहार पूर्ण करावे लागतायत'. रवींद्रनाथांच्या संवेदनशीलतेबरोबर स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्त्रीचा विचार - जो आजही कोणत्याच लेखकाच्या कोणत्याही कथेतला नायक करू शकणार नाही, तो - त्यांनी सुमारे 75 ते 110 वर्षांपूर्वी केला, ह्याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

तरीही रवींद्रनाथ इथेही थांबत नाहीत. त्यांची कथा पाश्चिमात्य स्वैराचाराची नाही. त्यातली पात्रं भारतीय मातीचीच आहेत. अंतिमत: भारतीय संस्कृतीचा, समाजातल्या मूल्यांचा विचार करूनच ती त्या चौकटीत राहतात. सरतेशेवटी एक उत्कट, आदर्श आणि उदात्त भावना कथा व्यापून राहते. 'गीतांजली'ला नोबेल पुरस्कार मिळाला, तेव्हा तितकेच समर्थ असे समकालीन इतरही कवी स्पर्धेत होते. निराशावाद आणि नकारात्मकता ह्या तुलनेत रवींद्रनाथांची कविता ही जगण्यातली शाश्वत मूल्यं जपणारी म्हणून पारितोषिकपात्र ठरली. त्यांच्या कथांचा शेवटही सत्य शिव सुंदरतेमध्येच होतो. कथेतली पात्रं - खासकरून स्त्री पात्रं अशीच. 'चोखेर बाली' कथेतील विधवा बिनोदिनी स्वत:च्या वैधव्याला महेनला जबाबदार धरते. महेनने लग्नाला नकार दिल्याने ही दुर्दशा ओढवली, ह्या भावनेतून सूड घेण्याचा प्रयत्न करते. विवाहित महेन तिच्याकडे आकर्षिला तरी शेवटी बिनोदिनी त्याच्या आयुष्यातून निघून जाते. बिनोदिनी असो किंवा वडिलांचे स्वप्न साकार व्हावे म्हणून निघून जाणारी ऊर्मी, वडिलांच्याच स्वप्नाला न्याय देता यावा आणि नवीनमाधवच्या कामात व्यत्यय नको म्हणून निघून जाणारी विभा, हे सगळे प्रेमाबरोबरच त्यागासारखी उच्च मूल्ये जपतात. 'महामाया' कथेतील विधवा मित्राबरोबर नवीन जीवन सुरू करतेच, पण वेळ आल्यावर कणखरपणे घरही सोडते. 'पहिला नंबर' कथेतील अनिलालाही आत्मभान येते. 'अपरिचिता' कथेतील नायिका मातृभूमीच्या सेवेचं व्रत घेऊन लग्नाला नकार देते. एक उदात्त भाव ठेवून कथा संपतात.

कालातीत मूल्यांना धक्का न लावताही स्त्री ही केवळ मुलगी, पत्नी, सून आणि उपभोग्य वस्तू ह्या सगळया भूमिकांच्या व्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी देणाऱ्या आणि आज 75 ते 110 वर्षांनंतरही काळाच्या पुढे वाटणाऱ्या साहित्यकृती लिहिणाऱ्या रवींद्रनाथांकडे बघताना अतिशय आश्चर्य वाटतं. त्याबरोबरच आजचं साहित्य, स्त्रीकडे बघण्याची आजच्या पुरुषाची दृष्टी, आजचे चित्रपट, जाहिराती, हे बघितलं की आज 155व्या जयंतीलाही रवींद्रनाथांसारख्या द्रष्टया साहित्यिकाची आणि स्वत:च स्वत:च्या मानसिक गुलामगिरीत राहणाऱ्या स्त्रियांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अशा साहित्याची नितांत आवश्यकता आहे, हे जाणवतं



⁠⁠⁠Buddha In a Traffic Jam

आजादीचे नारे आणि देशाचे तुकडे करण्याची भाषा बोलणाऱ्या कॉलेज ‘कुमारांना’ किंवा

"स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला
काम नाय हाताला
भाकर नाय पोटाला
तोंड वर करून काय इचारतो मला ... ?
स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला .... ??"

असे केवळ प्रश्न उपस्थित करून हातात काहीएक उत्तर नसणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध माओ, सोशालीस्ट आणि कम्युनिस्ट विद्रोही आंदोलनाचा पोकळ निरर्थकपणा दाखवणारी कथा म्हणजे 'Buddha In Traffic Jam'.

आई वडिलांपासून सुरु करून सतत प्रस्थापित गोष्टींविरुद्ध बंड करणाऱ्या आजच्या पिढीला सोबत मिळाली आहे एका धारदार शस्त्राची ती म्हणजे सोशल मिडिया आणि इंटरनेट. शस्त्र हे केव्हाही दुधारीच ! ते शस्त्र विक्रम पंडित वापरतोय. 'सो कॉल्ड' संस्कृती रक्षकांविरुद्ध तो फेसबुकवर एक कॅम्पेन चालवतो ज्याला भरपूर प्रतिसाद येतो. पण बरोबरीने तो विचारीही आहे. पब मध्ये बसून, पार्ट्या करत, गर्ल फ्रेंडबरोबर दारू पीत का होईना त्याला गरिबी, करप्शन ह्यावर विचार करावासा वाटतो. सोशल मेडीयामुळे का होईना पण सध्याच्या तरुणांचा हाही एक वैचारिक बदल पिक्चरमध्ये छान टिपलाय. पण त्याच्या विद्रोही बोलण्याने त्याला एका माओवादी activity मध्ये involve करून घ्यायचा प्रयत्न होतो.

पुढे पिक्चरमध्ये येतो तो अशा वैचारिक अधिष्ठान नसणार्या विद्रोहाचा निरर्थकपणा आणि ज्या विचाराने अशा चळवळी सुरु झाल्या असतील त्याचा पूर्णतः मागे पडलेला उद्देश, शेवट गरीब, असहाय आदिवासी, मागास जनता ह्यांची पिळवणूक आणि ससेहोलपट.

बरोबरीने जे आहेत ते व्यवस्थेचे प्रश्न आहेतच! मात्र इंटरनेट आणि सोशल मिडीया ह्याचा चांगला उपयोग करूनही बरेच काही बदलू शकते आणि व्यवस्थेमध्ये राहूनच व्यवस्था बदलता येऊ शकेल असा उत्तम संदेश नवयुवकांचा प्रतिनिधी विक्रम पंडित देतो. वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्या विचारांनी सुरुवात केली त्या विचारांनी वयाच्या उत्तरार्धात का होईना काही उत्तर दिलं का ह्या प्रश्नावर वैचारिक विद्रोही traffic jam मध्ये अडकलेल्या मानसिकतेतच राहतात.

पिक्चरमध्ये pottery म्हणजे मातीची कलात्मक मडकी करण्यासंदर्भात कथेचा एक भाग येतो. नवीन पिढीमध्ये असणार्या क्षमता आणि pottery प्रमाणे त्याला चांगला आकार देण्याची म्हणजे खोलवर, सर्वांगाने विचार करायला लावण्याची गरजही हा सिनेमा दाखवतो. शेवटी खुद्द माओचेच एक वाक्य "Revolution is not a dinner party" हे दाखवून सध्याच्या चालू विद्रोही चळवळींचा फोलपणाही लक्षात आणून देतो.

नक्षलवादी, सोशालीस्ट, कम्युनिस्ट ह्यांच्या समर्थकांनीही आणि विरोधकांनीही पहावा असा ''मस्ट वॉच'' आणि ''मस्ट प्रमोटेबल" मुव्ही... Buddha in a traffic jam!!!

- विभावरी बिडवे
⁠⁠⁠⁠
जुना मित्र भेटला आणि आठवणी निघाल्या. आता हा काय करतो ती काय करते ह्यामधेच बराच वेळ गेला. आमच्या लॉ कॉलेजला केरळी विद्यार्थी विद्यार्थिनी खूप असायचे. त्यातला एकजण आमच्या एका मैत्रिणीमध्ये इंटरेस्टेड होता. तो कुठे practice करतो असा विषय निघाला तर मित्र म्हणाला पक्का communist झालाय! सतत तसल्याच पोस्ट्स असतात. मित्राला अच्छा म्हणाले आणि गाडीवर असेच अनेक विचार सुरु झाले. ती मैत्रीण त्याला हो म्हणाली असती तर आत्ता काय करत असती वगैरे. घरातल्या एकदम धार्मिक पारंपारिक वातावरणातून असं communist वगैरे मध्ये adjust झाली असती का?

मला अमृता प्रीतमच्या पिंजरमधल्या पूरोची तीव्रतेने आठवण आली. फाळणीदरम्यान कित्येक स्त्रियांना खूप अत्याचार सहन करावे लागले त्यातलीच पूरो एक! पराधार्मियाकडून अपहरण, तीव्र धक्का, वेदना, असहायता, तत्कालीन परिस्थतीत घरच्यांकडून पुन्हा परतीसाठी मार्ग बंद आणि मग आयुष्याशी समायोजन करणे. पुढे स्त्रीच्या मनातली प्रेमाची मातृत्वाची उपजत भावना आणि मग मिळेल त्या मातीत मिसळुन जाण्याची तिची स्वाभाविक आदिम वृत्ती! स्वतःच केलेले परतीचे बंद मार्ग. अमृता प्रीतम ! तरल लेखिका!

मला नुकत्याच बघितलेल्या सैराटची पण आठवण आली. घरातलं ऐश्वर्य, मानमरातब सोडून येऊन मी किडा मुंगीसारखं नाही रे जगू शकत म्हणणारी आर्ची! मिळालेल्या पहिल्या पाच पन्नास रुपयात दहा रुपयाचं घराच्या चित्राचं पोस्टर आणणारी, नवीन परिस्थितीत तगमग होणारी आणि शेवटी सर्व जबाबदारी स्वीकारून factory मध्ये काम करताना हैद्राबादी अबोलीचा गजरा माळणारी, चटकन भाषा अवगत करणारी, चाळवजा खोलीसमोर रांगोळी काढणारी, आईला अभिमानाने स्वतःचा आणि नवर्याचा पगार सांगणारी आर्ची!

स्त्रिया अशा आहे त्या मातीत मिसळुन जातात. आणि पुरुष पार्यासारखे अलिप्त का राहतात? किंबहुना राहतात का? नसतीलही....

दुपारचे चार साडेचार होऊन गेलेले असावेत. उन्हानं आख्खं शिवार तापलं होतं. एका बाजूला छोट्याशा डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला उन्हं कलत आलेलं विस्तीर्ण दिसणारं क्षितीज. गाडीतून उतरून मी शेताकडल्या पायवाटेने चालायला लागले. नुकतीच नांगरणी झाली होती. तापून तापून खमंग कुरकुरीत झालेली काळ्या काळ्या मातीची भुसभुशीत ढेकळं. पायाने स्पर्शावी वाटायला लागली म्हणून मी चपला काढून शेतात शिरले. पाय चांगलाच आत आत जात होता. पण तो रखरखीत स्पर्श आणि उन्हात चमकणारा काळभोर रंग प्राशून घ्यावासा वाटायला लागला. मी पायावर माती माती होऊन दिली... त्यातंच डोंगरांच्या बाजूने पावसाचे ढग आकाश व्यापत आले. दुसऱ्या बाजूच्या उन्हाच्या काहीलीवर जणू काळ्या रंगाची थंड थंड शाल पांघरून घ्यावी असं आकाश ! आणि मग टपोरे थेंब डोक्यावर, खांद्यावर मग माझ्या पायाखालच्या कोरड्या कोरड्या मातीवर ओघळून क्षणात दिसेनासे होत होते. नखशिखांत सगळ्या ढेकळानी थेंब प्राशून घेतले आणि मग ती सैलावली, ... मृद्गंधी निश्वास टाकून सुस्तावली ... ताड ताड पावसाने क्षितिजावर एक सोनेरी किनार फक्त बाकी ठेवली. माझे मातीचे पायही विरघळून जातील एवढा झिरपत आला पाऊस... श्वास मृद्गंधी होतील एवढा भिनत गेला पाऊस...

पहाटे पहाटे जाग आली तेव्हा नुसतंच कुंद कुंद वातावरण होतं...