Sunday, February 28, 2016

जुवनाइल जस्टीस अॅक्ट प्रमाणे मेजोरीटी वय हे १८ वरून १६ करण्याचे बिल पास झालंय. राष्ट्रपतीची सही होण्यात काहीच अडचण येईल असं वाटत नाहीये. २००० सालापर्यंत हे वय असही सोळाच होतं. पण भारतातली दारीर्द्र्यरेषेखालील लोकसंख्या, ती मुलं, त्यांना मिळणारं शिक्षण, सुविधा आणि त्यांची सुधारण्याची शक्यता अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन ते वय तेंव्हा १८ करण्यात आलं होतं. आत्ता दिल्ली घटनेनंतर पुन्हा एकदा विषय चर्चिला गेला आणि आता ते वय पुन्हा १६ करण्यात येईल. मात्र सदर बिलामध्ये एक मेख आहे. सर्वसामान्य माणसाला हे वय सरसकट १६ केल्याच्या आनंदात राहता येणार नाही. कारण १६ ते १८ वयोगटातल्या व्यक्तीने अत्यंत हीन, घृणास्पद गुन्हा केला असल्यासच तो सज्ञान व्यक्तीप्रमाणे ट्रायल ला पात्र असेल. नाहीतर तो जुवानाइलच समजला जाईल. म्हणजे पुन्हा जास्तीजास्त ३ वर्षे सुधारगृहात राहून सुटून जाईल. ह्याचा अर्थ अगदी दिल्ली इतका घृणास्पद रेप नाही करायचा एवढच! साधा चालेल !!!!!!

खरंतर लैंगिक गुन्हे किंवा रेपसारख्या गुन्ह्यांमध्ये अशी सूट ठेवायची काहीच कारण नाही. मुळात रेप हा गुन्हाच इतका घृणास्पद आहे कि अशा सुटीची / डिस्क्लेमरची काहीच आवश्यकता नाही. पुन्हा तो तसा झाला आहे कि नाही हे हा मुद्धा आधी खालच्या कोर्टात उपस्थित केला जाईल. मग तो मुद्दा हाय कोर्टात जाईल आणि वर्षानुवर्षे केसेस चालू राहतील. एखाद्या कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार हा फक्त हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला आहे म्हणजे प्रायमरी इशू म्हणून हा गुन्हा हिनिअस आहे किंवा नाही ह्या मुद्द्यावरच प्रकरण हायकोर्टा मध्ये अडकून बसेल. पुन्हा ज्या तळागाळातील कमी वय असणाऱ्या गुन्हेगारांचा विचार करून ही सूट ठेवली आहे त्याचा त्यांना काहीच उपयोग नाही कारण अशी ‘मुलं’ हाय कोर्ट किंवा तिथले वकील कितपत नेमू शकतील आणि फी परवडू शकेल हा प्रश्नच आहे. आणि श्रीमंत लोक (फी परवडल्यामुळे) तसा अर्थ लावून घेतीलही. तरिही हे argument हे काही एखादा कायदा पास करायचे किंवा न करायचे सबळ कारण नाही हे मलाही माहित आहे.

कायदा म्हणजे logic . कोणत्याही अभ्यासाशिवाय एखादी सामान्य बुद्धी असणारी व्यक्ती सांगू शकते चोरीला काय प्रमाणात शिक्षा असू शकते आणि खुनासाठी काय असू शकते. अशाच logic चा विचार केला तर वय वर्षे सोळाखालील मुलीच्या संमतीने ठेवलेला शारीरिक संबंधही रेपच असतो. ह्याचा दुसरा अर्थ असा कि वय वर्षे सोळा पुढील मुलगी आपल्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवू शकते. ही तरतूद अशासाठी कि सोळा वयाखालील मुलगी ही तिच्या अज्ञानामुळे तिला फूस लावून असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते मात्र १६ च्या पुढे आपले भले बुरे कळण्याची तिला अक्कल येते. जर शारीरिक संबंधाबाबत मुलीच्या बाबतीत ही अक्कल १६ वयाला येते तर बळजबरी करून अशी गोष्ट करणे हा गुन्हा आहे ही अक्कल १६ वयाच्या मुलालाही logically यायलाच पाहिजे.

त्यामुळे हिनिअस क्राईम वगैरे डिस्क्लेमर्स काढून टाकून किमान लैंगिक गुन्ह्यांच्या बाबतीत तरी हे वय सरसकट १६ केलं पाहिजे.

No comments:

Post a Comment