Sunday, February 28, 2016

कट्यार बाय वासुदेव बिडवे

बरेच दिवस वाट पाहून अखेर परवा 'कट्यार काळजात घुसली' सिनेमा पाहण्याचा योग आला. त्यानिमित्ताने ज्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या, त्याविषयी थोडेसे...

तसे ते मूळ नाटक मी किमान २२-२५ वेळा तरी पाहिलेले असेल... अतिशयोक्ती नाही, शब्दशः खरंच! आणि केवळ कट्यारच नाही तर इतरही अनेक संगीत नाटके मी प्रत्येकी अशीच शब्दशः 'अनेकदा' पाहिलेली आहेत. सौभद्र, मानापमान, मत्स्यगंधा, स्वयंवर, ययाती आणि देवयानी, विद्याहरण, संशयकल्लोळ, शाकुंतल, पंडितराज जगन्नाथ, मृच्छकटिक, हे बंध रेशमाचे, स्वरसाम्राज्ञी, मंदारमाला, इ. मी पाहिलेली इतर संगीत नाटके सांगता येतील. ही यादी मी "ते नाटक किती वेळा पाहिले" त्याच्या उतरत्या क्रमाने लिहिली आहे. त्यातली बरीचशी नाटके मी 'भरत नाट्य संशोधन मंदिर'ने बसविलेली आणि त्यांच्याच 'भरत नाट्यगृहात' पाहिलेली होती. अगदी 'भरत' मधल्या कुठल्या कुठल्या क्रमांकाच्या खुर्च्या बरोब्बर पंख्याच्या खाली येतात आणि त्यातले कुठले पंखे फिरताना आवाज करतात, ते ही मला त्याकाळी पाठ होते! पं. रामदास कामत, डॉ. क्षमा वैद्य, पं. प्रभाकर करंदीकर, डॉ. राम साठ्ये, कीर्तनकार चारुदत्त आफळे, रवींद्र कुलकर्णी, रवींद्र खरे, अस्मिता चिंचाळकर, संजीव मेहेंदळे, अनंत कान्हो, इ. कलाकार आणि राजीव परांजापेंसारखे वादकही अनेकदा फिरून फिरून तेच तेच असत. त्यांचीही एकमेकांमध्ये छानशी 'भट्टी' जमून आल्याचे लक्षात येई. संध्याकाळी ५ - ६ वाजता सुरु होणारी ही नाटके रात्री १२ - १ पर्यंत चालत. अनेक गाण्यांना तीन-तीनदा 'वन्स-मोअर' मिळत असे. अनेकदा 'वन्स-मोअर' म्हणून गर्दीतून ओरडण्याची सुरुवात मीही करत असे
wink emoticon
कॉलेजला असताना त्या पाहिलेल्या सर्व नाटकांची तिकिटेही मी जपून ठेवली होती. त्या तिकिटांवर पाठीमागे त्या प्रयोगातल्या कलाकारांची नावेही मी लिहून ठेवत असे. पुढे मग धनकवडीमधली माझी राहायची जागा बदलताना तिकिटांचा तो सगळा गठ्ठा कुठेतरी गेला.

'कट्यार' हे नाटकही असेच अनेक वेगवेगळ्या कलाकारांच्या संचांनी केलेले मी पाहिले. मी सांगतोय हा काळ १९९१ ते २०१५ पर्यंतचा (२५ वर्षांचा) आहे. पं. पद्माकर कुलकर्णी, पं. चंद्रकांत लिमये, चारुदत्त आफळे, राहुल देशपांडे यांनी केलेले 'खांँसाहेब'... पं. प्रभाकर करंदीकर यांनी केलेले 'पंडित भानुशंकर'... रवींद्र कुलकर्णी, संजीव मेहेंदळे, महेश काळे यांनी केलेला 'सदाशिव'... डॉ. राम साठ्ये, अनंत कान्हो, स्व. प्रकाश इनामदार, रवींद्र खरे, सुबोध भावे यांनी केलेला 'कविराज बाँकेबिहारी'... डॉ. क्षमा वैद्य, अस्मिता चिंचाळकर यांनी केलेल्या 'उमा - झरीना'... रवींद्र खरे, संजीव मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात केलेले 'चाँद - उस्मान'... त्यातली अनेकदा वन्स मोअर मिळालेली पदे... 'छोटा सदाशिव'ने 'दिन गेले भजनाविण सारे' या पदाला दरवेळी हमखास घेतलेल्या टाळ्या... कुणी कुणी अनेकदा संवादांमध्ये घेतलेल्या उत्स्फूर्त 'additions'... वेळोवेळी गरजेनुसार वगळलेले संवाद/प्रसंग/पदे... वेळोवेळी बदलत गेलेले नेपथ्य... सगळ्या गोष्टी स्वच्छपणे आजही आठवतात. कट्यारचे अनेक संवादही तोंडपाठ झाले होते. अर्थात आताच्या धावपळीच्या दिनक्रमात इतकी नाटके पाहणे होत नाही.

या गेल्या २५ वर्षांत 'कट्यार' चे स्वरूप दरवेळी बदलत गेलेले मी पाहिलेय. पूर्वी सहा सहा तास चालू शकणारी संगीत नाटके आता नवीन कमर्शिअल पद्धतीत अडीच - तीन तासात संपवावी लागतात. त्यामुळे हे बदल अपरिहार्यच आहेत. यासाठी नाटकाच्या सादरीकरणात खूप ठिकाणी काट-छाट होत गेली. नांदी नंतर येणारे उमेच्या तोंडी असणारे सुरुवातीचेच 'करात उरली केवळ मुरली उरात हे काहूर... हरवले मधु मुरलीचे सूर' हे पुढची कथा बीजरूपाने सांगणारे पद येई. त्यातले भैरवीचे सूर एक दर्दभरे वातावरण तयार करीत. त्याची जागा पुढे फक्त एका दोन ओळींच्या गद्य संवादाने घेतली. झरीनाच्या तोंडची आधीची किंवा खांँसाहेबांच्या तोंडची नंतरची 'लागी कलेजवाँ कटार' ही ठुमरी मधेच इतर पात्रांचे 'यथोचित' संवाद घुसडून थांबवण्यात येऊ लागली, त्यामुळे तिला मिळणारे 'वन्स मोअर' सुद्धा ओघानेच बंद पडले आणि वेळ वाचू लागला. 'खुश रहे सनम मेरा' आणि 'कवन देस कवन नगरीयामें' ह्या खांँसाहेबांच्या खासगी रीयाझामधल्या बंदिशीही दोन-तीन मिनिटात 'गुंडाळण्यात' येऊ लागल्या. त्यात एक 'रागमाला' नावाचा अतिशय सुंदर भाग आहे, जो सदाशिव, उमा आणि झरीना यांच्या सोबतीने कविराज सादर करतात… त्या 'रागमाले'मधेही मधेच एखाद्या प्रयोगात एखाद्या रागाला काढून टाकण्यात येऊ लागले. 'दीपकळी मी दीपकळी', 'भूला भटका पथहारा' ही पदे तर पूर्ण हद्दपारच झाली. आणि बाकीची कोणतीही पदे फारशी रंगवत बसायचे नाही असेही कदाचित ठरले. 'तेजोनिधी लोह गोल' नंतर झरीनाच्या खोलीत तिच्या ओढणीखाली लपवून ठेवलेला सदाशिवचा तानपुरा अचानक खांँसाहेबांना सापडतो, तो प्रसंगही पूर्णपणे हद्दपार झाला. इतके सगळे बदल होताना पाहूनही गेल्या पंचवीस वर्षात हे नाटक कधी नकोसे झाले नाही, की ते बदल मूळ कथेत आणि रसनिर्मितीत कधी बाधक ठरलेले वाटले नाहीत.

प्रत्येक कलाकार तीच भूमिका वेगळ्या पद्धतीने सादर करायचा. उदाहरणार्थ बोलायचे झाले तर वर लिहिलेल्या यादीतल्या डॉ. राम साठ्ये, अनंत कान्हो, स्व. प्रकाश इनामदार, रवींद्र खरे, सुबोध भावे यांनी केलेला 'कविराज बाँकेबिहारी'... प्रत्येकाची संवादाची फेक निराळी, प्रत्येकाचा त्या संवादातला विनोद सादर करायचा ढंग निराळा, प्रत्येकाचा आंगिक अभिनय निराळा, प्रत्येकाची 'रागमाला' आणि त्यातल्या कविता सादर करायची अदाही निराळी... नाटक तेच, पण वेगवेगळ्या टीमने वेगवेगळ्या पद्धतीने सादर केलेले बघायला मिळाले. याचाच आता सिनेमा बनल्यावर "अजून एका वेगळ्या टीमने वेगळ्या पद्धतीने आणि आधुनिक तंत्राने सादर केलेली तीच कथा नवीन रूपात आपल्याला बघायला मिळणार" असेच माझ्या मनात होते.... आणि झालेही तसेच!!!

येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला आपले स्वतःचे असे काहीतरी नवीन करायचे असते. राहुल देशपांडेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढीतल्या कलाकारांना घेऊन दोन-तीन वर्षांपूर्वी सादर केलेले 'मानापमान' माझ्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या टीमच्या 'कट्यार' नाटकामध्ये नेपथ्यात केलेले अनेक चांगले बदल डोळ्यांसमोर होते. सुबोध भावेने अलीकडच्या सिनेमांमधून केलेले नवीन प्रयोगही डोळ्यांसमोर होते. त्यामुळे या नवीन पिढीतल्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेला सिनेमा काहीतरी 'नवीन' देणार याची खात्री होती. म्हणून हा सिनेमा पाहायला जाताना आधीच ठरवून ठेवले होते की "नाटकाशी तुलना करायची नाही"! पण ते जमले मात्र नाही… मनातून मूळ नाटकाशी तुलना होत राहिली आणि विशेष म्हणजे लक्षात येणारे सगळे बदल चांगले वाटत गेले… !!!

स्व. पुरुषोत्तम (मामा) दारव्हेकरांनी लिहिलेली मूळ कथा काही नवीन पण सुंदर बदल करून नवीन रूपात मांडून दाखविण्यात 'सुबोध आणि टीम' यशस्वी झाली आहे. नाटकाचे चित्ररूपांतर करताना काही बदल करावे लागणारच होते आणि अवश्य करावेतही. कारण नाटक करताना येणाऱ्या मर्यादा चित्रपट बनवताना येत नाहीत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन या नवीन टीमचे यश अजून कशात असेल, तर ते त्यांनी दाखवलेल्या नवप्रतिभेमध्ये (innovation) आहे. चित्रपटाच्या प्रभावी माध्यमाचा फायदा घेताना या लोकांनी जी नवप्रतिभा दाखवलेली आहे ती कौतुकास्पद आहे! या नवप्रतिभेची खूप उदाहरणे या सिनेमात दाखवून देता येतील.

मूळ कथेतली खांसाहेब आणि पंडित भानुशंकर ही पात्रे मामा दारव्हेकरांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडली आहेत. खांसाहेब प्रत्यक्ष रंगमंचावर तिन्ही अंकांत सुमारे पूर्णवेळ दिसतात, तर पंडितजी मात्र प्रत्यक्ष रंगमंचावर flashback पद्धतीने मिरजेत सदाशिवाच्या शिवमंदिरात एकदा आणि नंतर खांसाहेबांच्या हवेलीत येऊन सदाशिवला घेऊन जाताना अजून एकदा दिसतात. बाकी ते इतर पात्रांच्या संवादांमधूनच प्रेक्षकांना 'कळत' जातात. या ऐवजी इथे सिनेमात दोघांनाही समान वेळ पडद्यावर दाखवलेले आहे. नाटकात प्रत्यक्ष पंडितजींच्या तोंडी 'दिन गेले भजनाविण सारे' हे एकमेव गीत मामा दारव्हेकरांनी दिले आहे, मात्र त्यांची इतर गीते सदाशिव आणि उमेच्या तोंडी त्यांनी अतिशय खुबीने घालून 'पंडितजी' हे पात्र 'श्रेष्ठ गायक' म्हणून यशस्वीपणे उभे केले आहे. सिनेमात मात्र पंडितजींची गीते त्यांच्याच तोंडी दाखवून दिग्दर्शकाने ती कसर भरून काढली आहे आणि चित्रपट माध्यमाचा योग्य फायदा घेतलेला आहे!

'लागी कलेजवा कटार' ही ठुमरी मूळ नाटकामधले 'Theme Song'. कथेची सुरुवात आणि शेवटही याच ठुमरीने होतो. त्या ऐवजी 'सूर निरागस हो' ही theme सिनेमात घेतली आहे आणि कथेची सुरुवात आणि शेवटही त्यानेच केले आहेत!

नाटकात ग्रामोफोन आणि त्याच्या तबकड्यांचा केवळ उल्लेख आहे, तो ही वेगळ्याच प्रसंगात! तसेच मोठेपणी सदाशिवाचे संगीत शिक्षणही चालते ते पंडितजींनी लिहिलेल्या 'संगीत सुधाकर' या ग्रंथाच्याच आधारे (ज्यावर लहानपणी खट्याळ उमेने खाडाखोड करून 'संगीत सुधारक' असे लिहिलेले असते)... पण सिनेमात ग्रामोफोनचा अतिशय खुबीने वापर करून सदाशिवाचे शिक्षण त्याच्याच आधारे चालताना दाखवलेय! अजून एक innovation !!!

नाटकात अजून एक 'विशेष' पात्र आहे, ते म्हणजे हवेलीचा नोकर 'बद्रीप्रसाद'! हा मुका नोकर नाटकात सर्वत्र वावरतो, पण त्याचा खरा फायदा होतो शेवटच्या अंकात सदाशिवला! त्याच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप घेऊन हवेलीत सदाशिव राहू लागतो आणि हवेलीतली कामे करता करता खांसाहेबांची गायकी चोरून शिकायला लागतो. इथे सिनेमात मात्र सदाशिव अभिनिवेशाच्या पोटी लहान तोंडी मोठं घास घेताना खांसाहेबांसमोर पैज हरतो आणि नोकर म्हणून स्वतः हवेलीत काम करू लागतो. बिचारा 'बद्रीप्रसाद' मात्र सिनेमात 'अदृश्य' झालाय...

नाटकात विनोदी पात्र असणारा कविराज बाँकेबिहारी सर्वत्र दिसतो, पण सिनेमात मात्र कथा खांसाहेब, पंडितजी आणि सदाशिव यांच्याच भोवती फिरत राहते आणि कविराज दुय्यम होऊन जातो, तो 'विनोदी' सुद्धा राहत नाही... इतकेच काय, त्याचे नाव 'बाँकेबिहारी' सुद्धा सिनेमात कुठे आल्याचे मला आठवत नाही. (की मी नीट ऐकले नाही???) कथेत बदल करण्याचे दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य त्याने छान उपयोगात आणलेय! कविराज दुय्यम ठरल्यामुळे बिचारी 'रागमाला' मात्र सिनेमात नाहक बळी जाते... तसेच कविराज विनोदीही न दाखवल्यामुळे मूळ नाटकामधला खांसाहेब बाहेर गेलेले असताना चांद आणि उस्मानचा त्याला कोंडीत पकडून आणि 'नाजुकसी कलाई हो जिसकी वो तीर चलाना क्या जाने' अशी कव्वाली गात छळण्याचा धमाल प्रसंगही त्यामुळेच की काय, पण हद्दपार झालाय... नाटकातले दिवाणजी सुद्धा असेच 'दुय्यम' झालेत.

मूळ नाटकामधली 'मुरलीधर श्याम', 'दिन गेले' वगैरे पदे आपल्याला ग्रामोफोनमधून ऐकायला मिळतात. 'तेजोनिधी लोह गोल' हे पदही मूळ नाटकाच्या कथेतली जागा सोडून सिनेमाच्या कथेत वेगळ्याच जागेवर अगदी अनपेक्षितपणे ऐकायला मिळते… आणि "आहा" वाटून जाते! सदाशिवाच्या लहानपणी मिरजेत त्यांच्या शिवमंदिरात चालणारे संगीताचे शिक्षण सिनेमात शिवमन्दिराबाहेरही चालताना दिसते. त्यासाठी रात्री नदीवर जाऊन काजवे पाहण्याचा प्रसंग तर नवप्रतिभेची परमावधीच!!! त्या प्रसंगासाठी निवडलेले नवीन गाणे 'मनमंदिरा' सुद्धा अतिशय उच्च... यामुळेच छोटा सदाशिव आणि पंडितजी यांच्यामधली जुगलबंदी दाखवण्यासाठी 'दिन गेले'ची रदबदली करून 'मनमंदिरा'चा केलेला नवीन प्रयोग सार्थकी लागतो... मूळचे 'या भवनातील गीत पुराणे' या गीताची रदबदली करून नवीन बनवून टाकलेले गाणेही "वाहवा" मिळवून जाते. त्या गाण्यातच सांगितलय ना… "या भवनातील गीत पुराणे मवाळ हळवे सूर, जाऊद्या आज येथूनी दूर… नवे सूर अन नवे तराणे, हवा नवा तो नूर… जाऊद्या दूर जुने ते सूर…"

नाविन्याच्या इतरही अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सांगता येतील... पण सर्वात मोठ्या नवीन गोष्टी जर कुठल्या असतील तर त्या म्हणजे सर्व नवीन गाणी, त्यांचे अतिशय श्रवणीय संगीत, अतिशय देखणे सेट्स, आणि तितकेच देखणे चित्रीकरण...

सर्व कलाकारांनी केलेला अभिनय तर उत्तमच आहे, पण शंकर महादेवनचा 'अभिनेता' म्हणून पदार्पणाचा पहिलाच सिनेमा असूनही त्याने केलेला अभिनय इतरांच्या तुलनेत कुठेही कमी पडत नाही.

राहुल देशपांडे, महेश काळे, शंकर महादेवन आणि इतर सर्व पार्श्वगायक... शंभर पैकी शंभर गुण!!!

तात्पर्य काय, तर 'कट्यार' मध्ये गेली पंचवीस वर्षे जी स्थित्यंतरे बघतोय ती चांगली, छान, सुंदर तर होतीच... तसेच हे ही एक 'माध्यमांतर' चांगले, सुंदर, श्रवणीय झाले आहे!!! मूळ कथावस्तूला धक्का न लावता आधुनिक तंत्राने सादरीकरण करण्यात नवीन टीम यशस्वी झाली आहे, यात शंकाच नाही. सर्व नवीन टीमचे याबद्दल अभिनंदन!!!

बाय द वे, यातल्या काही मला न पटलेल्या गोष्टीही सांगाव्यात का… सांगतोच! अर्थात ज्यांनी मूळ नाटक फारसे पाहिलेले नाही, त्यांना ही माझी मते पटतीलच असे नाही…

सिनेमाच्या सुरुवातीलाच "आपल्याला दोन संगीत घराण्यान्मधला संघर्ष दाखवायचाय" असे सांगून 'घराणी कशी तयार झाली' वगैरे इतिहास छान दाखवलाय खरा, पण पुढे मात्र हा विवेक जरा सुटल्यासारखा वाटतो. ही लढाई खांसाहेबांची वैयक्तिक असल्यासारखी दिसत राहते. ते खुनशीपणाने वागताना दिसतात. खांसाहेबांचा 'घराण्याचा अभिनिवेश' दिसायच्या ऐवजी त्यांचा व्यक्तिगत अहंकार दिसायला लागतो. मूळ नाटकात खांसाहेब अजिबात गर्विष्ठ आणि खुनशी नाहीत, उलट मोठ्या मनाचे आहेत. हवेलीत आल्यावर तिथली मूळची मुरलीधराची मूर्ती ठेवून घ्यायला लावतात, चांद आणि उस्मानचा विरोध असूनही… सदाशिवला ते आधी 'काही गाऊन दाखव' म्हणून सांगतात आणि त्याची गायकी पाहिल्यावर मगच तार्किक आणि पटण्याजोगे कारण सांगून शिष्य करून घ्यायला नाकारतात. पूर्ण नाटकभर ते पंडितजींना 'मोठा गायक, मोठा माणूस' वगैरे शब्दांनी गौरवताना दिसतात. पंडितजींना आपल्या बायकोने शेंदूर खायला घातल्याचे समजल्यावर तिच्यावर रागावून तिला तलाक देऊन सोडून विश्रामपूरला येत नाहीत, तर ती स्वतःच मथुरेला मागे राहते आणि खांसाहेबांना तिथूनच 'खुदा हाफिज' करते, आणि खांसाहेब मात्र 'आपण दारू प्यायल्यामुळेच हा सगळा अनर्थ ओढवला' असे मानून स्वतःवर रागावून दारू प्यायचे सोडून देतात. सदाशिवाची गायकी सुद्धा चांगली असल्याचे ते वेळोवेळी मान्य करताना "वाह खूब… क्या मिजाज पाया है लौंडेने…" असे त्याचे कौतुक करतात. "ऐ परवरदिगार, काश तू ऐसा एक शागीर्द मेरे घराने में पैदा करता…" अशी ते त्यांच्या देवाकडे खंतही व्यक्त करतात. अशा वाक्यातून त्यांचा घराण्याविषयीचाच अभिनिवेश दिसतो, सदाशिव किंवा पंडितजी यांच्याबद्दल आकस नव्हे. इथे सिनेमात मात्र ते पंडितजींच्या विषयी मनात अतिशय टोकाचा आकस ठेऊन सदाशिवला शिष्य म्हणून नाकारतात.… इतकेच काय, सदाशिवही त्यांना पहिल्याच भेटीत फटकळपणे "नाही हां… पंडितजी हेच श्रेष्ठ गायक आहेत" वगैरे असले काहीतरी ऐकवतो!!! आणि या भावना सिनेमाभर तशाच राहतात… कथेत बदल करण्याचे स्वातंत्र्य म्हणून जरी याकडे बघितले, तरी वर म्हटल्याप्रमाणे सिनेमाच्या सुरुवातीशी मात्र या गोष्टी जुळत नाहीत, म्हणूनच पटत नाहीत.

'कट्यार काळजात घुसली' या नावाचे सुद्धा एक logic नाटकात मांडले आहे. त्यालाच अनुसरून 'लागी कलेजवा कटार' ही ठुमरीही नाटकात सुरुवातीला आणि शेवटी येते. सिनेमात मात्र ही ठुमरी एकदाच अभिषेकी बुवांच्या आवाजात एका प्रसंगात पार्श्वसंगीत म्हणून येते, तीही अर्धवटच! हे पाहता या सिनेमाचे नावही बदलून 'सूर निरागस हो' वगैरे असे काहीतरी ठेवले असते, तरी चालले असते असे वाटते…

सदाशिवाचे खांसाहेबांना ठार मारण्यासाठी रात्री हवेलीत घुसणे, खांसाहेबांनी आत्महत्येचा प्रयत्न करणे, वगैरे गोष्टी अगदीच 'फिल्मी' आणि सिनेमात उगीचच patch work केल्यासारख्या वाटतात.

-- वासुदेव बिडवे

No comments:

Post a Comment