.
|
कथाकार रवींद्रनाथ
evivek.com
रवींद्रनाथ टागोरांबद्दल लिहिलेल्या साप्ताहिक विवेक मधील लेख.
कथाकार रवींद्रनाथ आपल्या गीतांजली काव्यसंग्रहाने साहित्याचं नोबेल मिळवणारे पहिले भारतीय, आपल्या राष्ट्रगीताचे गीतकार, संगीतकार म्हणून आपल्याला त्यांचा विशेष अभिमान! साहित्याबरोबरच चित्र, नाटय, शिक्षण अशा सगळयाच क्षेत्रांत आपला खास ठसा उमटवणारे रवींद्रनाथ ह्यांच्या विविध पैलूंची नुसती ओळख करून घेणं हे तसं एका लेखातलं काम नाही.रवींद्रनाथ टागोर ह्यांची 8 मे रोजी 155वी जयंती. याचे औचित्य साधून केलेला हा लेखप्रपंच. आयुष्य व्यापून टाकेल असं एक खूप मोठं जिगसॉ असावं आणि त्याचे काही तुकडे हरवून जावेत, आयुष्यभर ते सोडवायचा प्रयत्न करावा.., कधी ह्या बाजूने, कधी त्या बाजूने, कधी उलट कधी सुलट... तरीही ते लागू नये आणि त्या प्रयत्नांत रिकाम्या जागी अत्यंत सूक्ष्म भावदर्शी कल्पनारम्य तुकडे असे काही बसावेत की सगळया बाजू खऱ्या वाटाव्यात, परिपूर्ण वाटाव्यात. स्वत:च्या झालेल्या वैयक्तिक हानीतून स्त्रीमनाचा एवढया तरलतेने विचार करत कथा लिहिणारे प्रतिभावंत कथालेखक रवींद्रनाथ टागोर ह्यांची 8 मे रोजी 155वी जयंती. आपण त्यांना प्रामुख्याने ओळखतो कवी म्हणून, शांतीनिकेतनचे सर्वेसर्वा म्हणून. आपल्या गीतांजली काव्यसंग्रहाने साहित्याचं नोबेल मिळवणारे पहिले भारतीय, आपल्या राष्ट्रगीताचे गीतकार, संगीतकार म्हणून आपल्याला त्यांचा विशेष अभिमान! साहित्याबरोबरच चित्र, नाटय, शिक्षण अशा सगळयाच क्षेत्रांत आपला खास ठसा उमटवणारे रवींद्रनाथ ह्यांच्या विविध पैलूंची नुसती ओळख करून घेणं हे तसं एका लेखातलं काम नाही. त्यांच्यातल्या कवीइतकाच त्यांच्यातला कथालेखकही तितकाच भावपूर्ण आहे. खासकरून त्यांनी लिहिलेल्या स्त्रीवादी कथेसंदर्भात तो अधिकच तरल मनाचा आहे. आधी आपण कथाकार रवींद्रनाथ ह्यांच्याशीच अपरिचित असतो. त्यातून स्त्रीवादी म्हटलं तर कोणालाही आश्चर्यच वाटेल. कोणत्याही कथेतून स्त्रीचा तथाकथित संघर्ष, तिच्यावरचे अन्याय, तिचे लढे, तिचे हक्क अशा कुठल्याही गोष्टीचं भडक चित्रीकरण न करता अत्यंत सौम्यपणे स्त्रीच्या मनाचं भावविश्व ते आपल्यापुढे उभं करतात. अगदी तिच्या प्रतिमेत शिरून. तिचं प्रेम, तिचा विरह, तिची मैत्री, मोह, द्वेष, श्रध्दा, सूड, तिचे आदर्श, तिचं स्वातंत्र्य, तिची निर्णयक्षमता... सगळं सगळं त्यांच्या कथेतून पुढे येतं आणि सुमारे एका शतकापूर्वी लिहिल्या गेलेल्या ह्या कथांतून भेटणारी कणखर स्त्री आपल्या डोळयासमोर आली की आपण अवाक होतो त्यातल्या स्त्री पात्रांमुळे आणि ज्यांनी त्या काळात तिची अशी प्रतिमा रंगवली अशा काळाच्या शेकडो पावलं पुढे असलेल्या रवींद्रनाथांच्या असामान्य प्रतिभेमुळे! त्यांच्या कथा आजही चौकटीबाहेरचा विचार करायला लावतात. 'तीन संगी' ह्या कथासंग्रहात भेटणारी लॅबोरेटरी कथेतील सोहिनी अशीच आहे. वरवर बघायला गेलं तर उच्छृंखल आहे. आपल्या सौंदर्याचा उपयोग करून आपला स्वार्थ साधणारी. पण तिच्या नवऱ्याच्या लॅबोरेटरी संदर्भातल्या व्रताशी तिची पूर्ण निष्ठा जोडली गेली आहे, ज्या व्रताशी एकनिष्ठता राखताना आपल्या मुलीचीही पर्वा करत नाही. एकीकडे तिचं वागणं आणि दुसरीकडे तिची ही निष्ठा ह्या दोन्ही गोष्टी कथेतून पुढे आणून रवींद्रनाथ त्यातल्या नैतिकतेचा निर्णय वाचकांवर सोडून देतात. नायकाचं प्रेम आणि वडिलांची शेवटची इच्छा ह्यामध्ये 'रविवार' या कथेतील विभाची द्विधा मन:स्थिती झालेली असली तरी प्रसंगी ती कठोर आहे आणि आपल्या विचारांशी ठाम आहे. 'अखेरचा शब्द'मध्ये, प्रेमामुळे नवीनमाधव आपल्या कर्तव्यात कसूर करतोय, त्याच्या कामात व्यत्यय येतोय, हे अचिराला जेव्हा कळतं, तेव्हा ती ठामपणे स्वत:हून दूर व्हायचा निर्णय घेते. 'पत्नीचं पत्र' ही रवींद्रनाथांनी लिहिलेली एक अफाट कथा आहे. अत्यंत देखणी आणि बुध्दिमान असलेली मृणाल जिच्या घरी 'बिंदू' नामक एक विधवा आश्रयाला येते, जिच्या आत्महत्येने मृणालच्या मनात स्त्री, तिचं संसारातलं आणि समाजातलं स्थान ह्याविषयीच्या प्रश्नांनी काहूर उठतं. मृणाल एक अशी नायिका, जी स्वत: सुखवस्तू घरातली स्त्री असूनही दुसऱ्या कोणाचं दु:ख बघून स्वत:चं वरकरणी का होईना दिसणारं सुख सोडून तत्त्वासाठी घर सोडते, नवऱ्याला पत्रातून धीटपणे सगळया गोष्टी कळवते आणि आपला मार्ग निवडते. नातेसंबंधातला त्रिकोण ह्याविषयी रवींद्रनाथांनी कितीतरी लिहिलं. त्यांच्या 'नष्टनीड' ह्या कादंबरीवरचा चारुलता हा चित्रपटही खूप गाजला. नष्टनीडमधील चारू आपल्या कल्पनाविश्वात रमता रमता दीर अमल ह्याच्याकडे आकर्षिली जाते. 'मालंच' कथेतील आदित्यच्या आयुष्यात पूर्वायुष्यातली सवंगडी सरला हिची जबाबदारी असते. 'दुईबोन'मध्ये पत्नीच्या आजारपणामुळे शशांक आणि पत्नीची बहीण उर्मिला ह्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते. त्या काळात असे विषय हाताळताना रवींद्रनाथ काळाच्या किती पुढे होते हे जाणवतं. नीती-अनीती, चूक-बरोबर ह्या पलीकडे जाऊन जसं आहे तसं ते स्त्रीचं चित्रीकरण करतात. तिची प्रतिष्ठा राखतात. तिच्या सर्व भावनांकडे आदराने बघतात. त्यातल्या तथाकथित कालसापेक्ष मूल्य, भावना ह्यापलीकडे जाऊन तिच्या मनाचे पैलू ते उलगडून दाखवतात. पण केवळ ह्यात त्यांचा मोठेपणा नाही. एक लेखक म्हणून स्त्रीला अशी रेखाटताना कोणतंही लेबल न लावता, व्यक्ती म्हणून ते तिचा स्वतंत्र विचार करताना दिसतात. त्यांच्या कथेतली स्त्री ही स्वतंत्र आहे; प्रसंगी ती चुकते, धडपडते, पण त्यातूनच सावरते आणि अंतिमत: योग्य निर्णय घेते. रवींद्रनाथ तिचं असं एक व्यक्तिस्वातंत्र्य जपतात. ती अबला नाही, लाचार नाही, केवळ दु:खाने गांजलेली नाही, असाहाय्य नाही. प्रसंगी सर्व सुखे हाताशी असताना ती काढता पाय घेते, बंडखोरी करते. आत्मभानाकरिता, उन्नतीकरिता ती संघर्ष करते. ती कणखर आहे. तिच्यामध्ये निर्णयक्षमता आहे. आपले निर्णय आपण घेण्याइतकी ती स्वत:ला समर्थ समजते. पुरुषांच्या मतांवर ती अवलंबून नाही. रवींद्रनाथ फक्त इथेच थांबत नाहीत. त्यांच्या कथेतील प्रत्येक पुरुष नायक स्त्री एक व्यक्ती म्हणून स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचं स्थान देतो. तो तिच्या निर्णयाचं स्वागत करतो, ते स्वीकारतो, त्याचा आदर करतो. कोणत्याच पुरुष पात्राकडून तिच्या स्त्रीत्वाचा आणि त्याच्या स्वातंत्र्याचा धिक्कार होत नाही. तिच्या चुकांवर अपराधी भावना लादली जात नाही. कितीतरी कथांत एक मित्र, एक जिवलग म्हणून पुरुष पात्र आहे, जो तिच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावतो, मात्र तो अधिकार गाजवत नाही. 'अपरिचिता'मधील पिता हुंडयातले दागिने वरपित्याने लग्नाच्या दिवशी तोलून मागितले म्हणून लग्न मोडण्याइतका आणि नंतर देशसेवा करण्याच्या मुलीच्या निर्णयात आडवा न येणारा आहे. 'त्याग' कथेतला हेमंत लग्नानंतर पत्नीची जात कळल्यावर 'मी जातपात मानत नाही' असं वडिलांना खंबीरपणे सांगतो. बायकोला सतत मागे खेचणारा निर्झरिणीचा नवराही अखेर तिचे गुण मान्य करतो. 'नष्टनीड' कथेतील विवाहित नायिका चारू दीर अमलमध्ये गुंतते. अमलच्याही हे लक्षात येऊन तो लग्न करतो आणि परदेशी निघून जातो. त्याच्या आठवणीत शोकमग्न झालेल्या चारूचा विचार करताना रवींद्रनाथांच्या लेखणीतून तिचा नवरा भूपती विचार करतो, 'हिला असं एकही ठिकाण नाही जिथे ती आपलं मन पूर्णपणे मोकळं करू शकेल, रडू शकेल आणि हा सगळा भार सहन करत तिला सर्वसाधारण लोकांप्रमाणे, तिच्या स्वस्थ शेजारणींप्रमाणे रोजचे घरातले व्यवहार पूर्ण करावे लागतायत'. रवींद्रनाथांच्या संवेदनशीलतेबरोबर स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्त्रीचा विचार - जो आजही कोणत्याच लेखकाच्या कोणत्याही कथेतला नायक करू शकणार नाही, तो - त्यांनी सुमारे 75 ते 110 वर्षांपूर्वी केला, ह्याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तरीही रवींद्रनाथ इथेही थांबत नाहीत. त्यांची कथा पाश्चिमात्य स्वैराचाराची नाही. त्यातली पात्रं भारतीय मातीचीच आहेत. अंतिमत: भारतीय संस्कृतीचा, समाजातल्या मूल्यांचा विचार करूनच ती त्या चौकटीत राहतात. सरतेशेवटी एक उत्कट, आदर्श आणि उदात्त भावना कथा व्यापून राहते. 'गीतांजली'ला नोबेल पुरस्कार मिळाला, तेव्हा तितकेच समर्थ असे समकालीन इतरही कवी स्पर्धेत होते. निराशावाद आणि नकारात्मकता ह्या तुलनेत रवींद्रनाथांची कविता ही जगण्यातली शाश्वत मूल्यं जपणारी म्हणून पारितोषिकपात्र ठरली. त्यांच्या कथांचा शेवटही सत्य शिव सुंदरतेमध्येच होतो. कथेतली पात्रं - खासकरून स्त्री पात्रं अशीच. 'चोखेर बाली' कथेतील विधवा बिनोदिनी स्वत:च्या वैधव्याला महेनला जबाबदार धरते. महेनने लग्नाला नकार दिल्याने ही दुर्दशा ओढवली, ह्या भावनेतून सूड घेण्याचा प्रयत्न करते. विवाहित महेन तिच्याकडे आकर्षिला तरी शेवटी बिनोदिनी त्याच्या आयुष्यातून निघून जाते. बिनोदिनी असो किंवा वडिलांचे स्वप्न साकार व्हावे म्हणून निघून जाणारी ऊर्मी, वडिलांच्याच स्वप्नाला न्याय देता यावा आणि नवीनमाधवच्या कामात व्यत्यय नको म्हणून निघून जाणारी विभा, हे सगळे प्रेमाबरोबरच त्यागासारखी उच्च मूल्ये जपतात. 'महामाया' कथेतील विधवा मित्राबरोबर नवीन जीवन सुरू करतेच, पण वेळ आल्यावर कणखरपणे घरही सोडते. 'पहिला नंबर' कथेतील अनिलालाही आत्मभान येते. 'अपरिचिता' कथेतील नायिका मातृभूमीच्या सेवेचं व्रत घेऊन लग्नाला नकार देते. एक उदात्त भाव ठेवून कथा संपतात. कालातीत मूल्यांना धक्का न लावताही स्त्री ही केवळ मुलगी, पत्नी, सून आणि उपभोग्य वस्तू ह्या सगळया भूमिकांच्या व्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी देणाऱ्या आणि आज 75 ते 110 वर्षांनंतरही काळाच्या पुढे वाटणाऱ्या साहित्यकृती लिहिणाऱ्या रवींद्रनाथांकडे बघताना अतिशय आश्चर्य वाटतं. त्याबरोबरच आजचं साहित्य, स्त्रीकडे बघण्याची आजच्या पुरुषाची दृष्टी, आजचे चित्रपट, जाहिराती, हे बघितलं की आज 155व्या जयंतीलाही रवींद्रनाथांसारख्या द्रष्टया साहित्यिकाची आणि स्वत:च स्वत:च्या मानसिक गुलामगिरीत राहणाऱ्या स्त्रियांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अशा साहित्याची नितांत आवश्यकता आहे, हे जाणवतं |
Tuesday, June 28, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment