Tuesday, June 28, 2016

केरळच्या एका माननीयांच्या बोलण्यातल्या उल्लेखावरून जरा शोधू म्हटलं आणि ही बातमी मला समजली तेंव्हा मी आश्चर्यचकित झाले. मी पेपर नीट वाचत नाही हे मला कळून चुकलं आणि लाजच वाटली. रोहित वेमुला, जेएनयु, कन्हैय्याकुमार, अफझल गुरु ह्यांचे हक्क किंवा अगदी शनीशिंगणापूरच्या चौथर्यावर जाण्याच्या अधिकाराइतका तसा काही ह्या महिलेचा हक्क मोठा नाही पण तरी मी पेपर नीट वाचायला पाहिजेतच...

तर ही चित्रलेखा केरळ मधल्या कन्नूर जिल्ह्यातली. प्रधान मंत्री रोजगार योजनेतून तिने २००५ साली रिक्षा घेतली आणि ती पोटापाण्यासाठी स्वतः चालवायला लागली. CITU म्हणजे Centre of Indian Trade Unions जी कम्युनिस्ट पार्टीशी संलग्न अशी राष्ट्रीय संघटना आहे त्याचे नियंत्रण असलेल्या stand वर हिने आपली रिक्षा उभी करायला सुरुवात केली. आणि ती दलित असल्या कारणाने CITU ने तिला ती तिथे लावण्यास मनाई केली. तिला शिवीगाळ आणि मारहाण तर केलीच पण त्या वर्षाच्या अखेरीस तिची रिक्षा पेटवून देण्यात आली. पोलिसांनी पार्टीच्या भीतीपोटी काहीही कारवाई करण्यास असमर्थता दाखवली.

दोन वर्षांनी तिला well wishers कडून दुसरी जुनी रिक्षा चालवायला मिळाली तेंव्हाही तिच्या मुलीवर हल्ला झाला, खोट्या केसेस केल्या गेल्या, तिच्याविरुद्ध जातविषयक कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून गुन्हे नोंदवले गेले, केवळ power आहे म्हणून स्थानिक CPM ने ३०० जणांच्या जमावाचा तिच्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून पोलीस स्टेशन ला मोर्चा काढला. २०१४ मध्ये Kerala Anti-Social Activities (Prevention) Act ह्या कायद्यान्वये CPM च्या आरोपावरून तिच्या नवर्याला अटक केली गेली.

२०१५ मध्ये ह्या सगळ्या संघर्षासाठी तिने १२२ दिवस कन्नूर कलेक्टरेट बाहेर धरणं धरलं. केवळ आत्मसन्मानाने काम करता यावं ह्या एका अधिकारासाठी मागच्या ११ वर्षांच्या संघर्षा नंतर कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांकडून तिला तिच्या पुनर्वसनाची हमी आणि घरासाठी जागा मिळण्याचं आश्वासन मिळालंय खरं पण त्याची पूर्ती व्हायची ती वाट बघत आहे. मागच्या महिन्यात त्यासाठी तिला पुन्हा आंदोलन सुरु करावं लागलं आहे.

कम्युनिस्ट पार्टीविरुद्धचा तिचा संघर्ष हा –

Right to Work
Right to Dignity
Equal Protection of law
Right to equality before law
Right of Prohibition of discrimination on grounds of religion, race, caste, sex or place of birth

ह्या मुलभूत हक्कांमध्ये येतो.

पण तो तितकासा महत्वाचा नाही. तो मोदींविरुद्ध नाही. तो हिंदुत्वविरोधी नाही. त्याने प्रसिद्धी मिळत नाही. त्याने TRP वाढत नाही. शनीशिंगणापूर, शबरीमल ह्यासारख्या परंपरांवर ओरड करणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसा बराच तकलादू पण आहे.

चित्रलेखाच्या आंदोलनाचं आत्ताचं स्टेटस आपल्याला माहित नाही कारण आपण पेपर नीट वाचत नाही.

No comments:

Post a Comment