दुपारचे चार साडेचार होऊन गेलेले असावेत. उन्हानं आख्खं शिवार तापलं होतं.
एका बाजूला छोट्याशा डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला उन्हं कलत आलेलं
विस्तीर्ण दिसणारं क्षितीज. गाडीतून उतरून मी शेताकडल्या पायवाटेने चालायला
लागले. नुकतीच नांगरणी झाली होती. तापून तापून खमंग कुरकुरीत झालेली
काळ्या काळ्या मातीची भुसभुशीत ढेकळं. पायाने स्पर्शावी वाटायला लागली
म्हणून मी चपला काढून शेतात शिरले. पाय चांगलाच आत आत जात
होता. पण तो रखरखीत स्पर्श आणि उन्हात चमकणारा काळभोर रंग प्राशून
घ्यावासा वाटायला लागला. मी पायावर माती माती होऊन दिली... त्यातंच
डोंगरांच्या बाजूने पावसाचे ढग आकाश व्यापत आले. दुसऱ्या बाजूच्या
उन्हाच्या काहीलीवर जणू काळ्या रंगाची थंड थंड शाल पांघरून घ्यावी असं आकाश
! आणि मग टपोरे थेंब डोक्यावर, खांद्यावर मग माझ्या पायाखालच्या कोरड्या
कोरड्या मातीवर ओघळून क्षणात दिसेनासे होत होते. नखशिखांत सगळ्या ढेकळानी
थेंब प्राशून घेतले आणि मग ती सैलावली, ... मृद्गंधी निश्वास टाकून
सुस्तावली ... ताड ताड पावसाने क्षितिजावर एक सोनेरी किनार फक्त बाकी
ठेवली. माझे मातीचे पायही विरघळून जातील एवढा झिरपत आला पाऊस... श्वास
मृद्गंधी होतील एवढा भिनत गेला पाऊस...
पहाटे पहाटे जाग आली तेव्हा नुसतंच कुंद कुंद वातावरण होतं...
पहाटे पहाटे जाग आली तेव्हा नुसतंच कुंद कुंद वातावरण होतं...
No comments:
Post a Comment