Tuesday, June 28, 2016

आमचे ओतूर खरेतर तिथल्या कापर्दीकेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पण तिथे अजून एक समाधी मंदिर आहे तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराजांचे ह्यांचे. कापर्दीकेश्वराच्या मंदिरापासून काही पायऱ्या चढून वर गेलं कि गोलाकार फिरणाऱ्या मांडवी नदीच्या काठावर ही महाराष्ट्रातल्या मोजक्या जिवंत समाधीपैकी एक जिवंत समाधी आहे. नेहमीच्या मंदिराप्रमाणे मंदिर आणि गाभारा असे त्याचे दोन भाग आहेत.

लहानपणी आम्ही जायचो तेंव्हा आतला गाभारा हा ग्रील दरवाजाने बंद असायचा आणि तिथे 'स्त्रियांना प्रवेश नाही' असे लिहिलेले असायचे. समाधी म्हणजे मातीने लिम्पलेला देह, खांदे, पाय असा साधारण ओळखू येईल असा गोलाकार भाग आहे. आम्ही कधी आतमध्ये जायचो नाही. वर्षातून फार फार तर एकदा गावात जायचे मग कशाला असाही विचार असायचा.

मग काही वर्षांनी तिथे दुपारी स्त्री पुरुषांचे भजन चालू असलेले दिसायचे. स्त्रियाही आत बाहेर करायच्या. त्या असतील तर आम्ही कधी आत जाऊन दर्शन घ्यायचो नसतील तर बाहेरूनच घ्यायचो. कधी कधी बायका समाधी भोवती जास्वंदीच्या फुलांची छान आरास करताना दिसायच्या. गावातल्याच बायका अगदी समाधीला स्पर्श करूनही दर्शन घेताना दिसायला लागल्या. मी सहजच आमच्या मंदिराच्या पुजारी काकूंना विचारलं तर त्या खूपच सहजतेने म्हणाल्या कि हो आता जातात बायका आतमध्येही. एवढं काही नाही... ह्याहून जास्त काही नाही. पण ती पाटी तशीच होती.

मग देवळाला रंग द्यायला काढला. आम्ही पुढच्या वर्षी गेलो तर देऊळ एकदम चकाचक आणि ती पाटीही नव्हती. रंगाच्या वेळेस काढून टाकली असणार. आम्ही सर्रास आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला लागलो. त्या जास्वंदीच्या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची आरास तिथे इतकी सुंदर करतात कि आतमध्ये जावं असं कायमच वाटायचं.

एवढ्या सहजतेने व्हायला हवं होतं सगळं.....

No comments:

Post a Comment