Tuesday, June 28, 2016

प्रवासामध्ये खासकरून रानावनातून जंगलातून प्राण्या पक्षांचा ध्यास घेत फिरताना एक गोष्ट मी अनुभवलिये. आपण ठरवलेली गोष्ट जशीच्या तशी बघायला मिळेलच कि नाही सांगता येत नाही पण दुसराच काहीतरी आणखी चांगला अनुभव येउन जातो ; अगदी अनपेक्षित असा.

मागे कान्हा मध्य प्रदेशला गेलो होतो, जिम कॉर्बेटला गेलो होतो तेंव्हा आपण वाघ बघायला जात आहोत हि गोष्ट डोक्यात इतकी घट्ट होती कि असंख्य मोर, हरिणे , बायसन्स, एकशिंगे, कोल्हे, किंगफ़िशर्स , फ्लायकॅचर्स असे कितीतरी प्राणी पक्षी दिसल्यावर वाटलेला अनपेक्षित आनंद वेगळाच होता. कितीतरी ट्रिप्स करूनही वाघ नाही तो नाहीच दिसला पण कोणालाही फारसं न दिसणारं अस्वल मात्र अगदी जवळून दिसलं. त्या वाघाच्या पाठीमागचं चेसिंगही भन्नाट असतं.

आपल्याबरोबर निघालेल्या गाड्या त्या अफाट जंगलात दिसेनाश्या झालेल्या असतात. दुतर्फा झाडे आणि गाड्यांच्या चाकांनी केलेला दुपदरी रोडवरून ओपन जीपमधून आजूबाजूला ढिगाने दिसणारे मोर, माकडं आणि हरिणं बघत आपण निघालेलो असतो. धुकं पूर्ण विरलेलं नसतं. जंगलातून ओल्या सालीच्या झाडांचा वास येत असतो. झाडांच्या सावल्या सळसळत असतात. वेगवेगळ्या पक्षांचा आवाज कानावर पडत असतो. आपल्याबरोबरचा गाईड आपल्याला नवनवीन पक्षी दाखवत असतो. मधेच आपल्या रस्त्यावर काळवीटं , हरीणं येतात आपण थांबतो. (खरंतर त्यांच्या रस्त्यावर आपण गेलेलो असतो तरी तीच निघून जातात) थोड्या आणखी गर्द जंगलात शिरल्यावर गाईड सांगतो वाघ खासकरून इथे आढळतात म्हणून. आपण उत्सुक उत्सुक होतो. मग गाईड आपल्याला वाघाच्या पावलांचे नवे जुने ठसे दाखवतो. त्यातल्या त्याला वाटणार्या नव्या ठशांच्या मागे तो आपल्याला घेऊन जातो. झाडांवर वाघांनी घासलेल्या नखांचे ओरखडे दाखवतो आणि तो इथे आसपास असल्याची ग्वाही देतो. आपण कुजबुजत राहतो. आणि तो आपल्याला एकदम शांत करतो आणि एक आवाज ऐकायला सांगतो. तो आवाज कधी हरीणांचा किंवा माकाडांचाही असतो. गाईड सांगतो कि हे प्राणी एकमेकांना कॉल्स देताहेत. ज्या प्राण्यांना वाघ दिसतो ते इतरांना सावध करतात. खासकरून माकडं हरिणांना कायम असे कॉल्स देऊन सावध करतात. काही पक्षीही आवाज काढतात. मग आपण अशा कॉल्सच्या दिशेने जातो. कसे कोण जाणे पण वेगवेगळ्या tracks वरून फिरणाऱ्या बर्याच जीप्स तिथे येतात. आणि मग सगळ्यांना शांत राहायला सांगितलं जातं. खूप वेळ शांत बसून आत दाट झाडीत लपलेला वाघ रस्त्यावर येइलच ह्याची काही शाश्वती नसते पण त्याच्यासाठी ते थांबणं, क्वचित त्याची डरकाळी ऐकू येणं, इतर प्राण्यापक्षांचा कानोसा घेत राहणं ही मिनिटामिनिटाला उत्कंठा वाढवणारी गोष्ट असते. एका क्षणाला ती उत्कंठा शिगेला पोचते आणि बहुतांश वेळा व्याघ्र दर्शनाशिवायच परतावं लागतं. निराशा तर वाटतेच पण गेल्या गेल्या एकदाचा दिसला असता तर हि सगळी मज्जा अनुभवायला मिळाली नसती असंही वाटतं.

खूप पूर्वी एकदा भिगवणला उजनीच्या back water मध्ये हिवाळ्यात खूप स्थलांतरित पक्षी येतात ते बघायला गेलो होतो. गाडी एका बाजूला लावून चालत पाणवठ्यावर जायला निघालो. दूर दूरपर्यंत एकही पक्षी दिसत नव्हता. १०० कि. मी. प्रवास करून फक्त तेवढ्यासाठी गेलो असताना घोर निराशा होतेय का असं वाटत असतानाच दूरवरची आख्खी जमीन हलायला लागली. आणखी जवळ जवळ जातोय तर त्या पूर्ण जमिनीने आकाशात झेप घेतली आणि शेकडो कदाचित हजारो अग्निपंख (फ्लेमिंगो/रोहित) आकाशात असे फिरायला लागले कि जणू लाल केशरी ज्वालाच. उन होतं, अर्धा एकतास पक्षी बघून परतीला निघालोही. हे पक्षी फार जवळ येऊ देत नाहीत आणि तेंव्हाच्या ३ एक्स झूम कॅमेर्याने जेवढं टिपणं शक्य होतं तेवढं टिपलं.

काल गेलो होतो तेंव्हा ३६ एक्स झूम कॅमेरा होता आणि फ्लेमिंगो एकपण नव्हता. कालही उन होतंच. पण एकदा दुपारी एका वेगळ्या गावातून पाण्यापाशी गेलो, मग जरा उन कलंडल्यावर दिसतात का म्हणून खूप वेळ हॉटेलमध्ये घालवला. दुपारनंतर पुन्हा तिथे जाऊन आलो. काहीजण म्हणाले त्या पुढच्या गावामधून गेलात तर तिथे जरा बोटीतून जास्त दिसतील. पुन्हा बाहेर पडलो आणि हायवेला लागून पुन्हा पुढच्या गावातून पाण्यापाशी आलो. तिथे बरेच नावाडी बोटिंग करा म्हणून आग्रह करत होते. पलीकडच्या किनार्यावर फ्लेमिन्गोज असतात म्हणाले, शक्यता वाटत नव्हतीच पण बघुयात तर म्हणून गेलो. बोटीत बसल्या बसल्या त्याने सांगितलं कि ती पलीकडे म्हणजे ज्या बाजूने आम्ही दुपारपासून दोन चकरा मारल्या होत्या त्या बाजूने दिसतात. एव्हाना आम्हाला त्याच्या आयडिया ची चांगलीच आयडिया येउन गेली होती. ह्यावर्षी बहुतेक आपल्याकडे कमी झालेला पाउस आणि ग्लोबर वार्मिंग दोन्हीमुळे पक्षांना कमी थंडाव्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची गरज वाटत नसावी. असो बोटिंग तर बोटिंग! सुर्य मावळत होता. प्लीजंट हवा. पर्यटक नाहीत, गर्दी नाही. जलाशयाच्या मध्यभागी येउन नाव थांबवल्यावर खूप सारे सीगल्स आरडाओरडा करत अगदी जवळपर्यंत येत होते. एका बाजूला वेगवेगळी बदकं, करकोचे, geese, बरेच पक्षी डौलात हिंडत होते, बगळे ध्यानस्थ बसले होते. नावाड्याने बरोबर मासे घेतले होते आणि तो चारही बाजूंनी तो ते टाकू लागला कि आमच्या अगदी जवळ येउन ते वेगवेगळे पक्षी दंगा करत होते. मावळतीचा सोनेरी केशरी रंग आणि पक्षांचा गलका, भन्नाट अनुभव. परत निघाल्यावर आकाशातून खूप उंचावरून एक फ्लेमिन्गोजची काळी रेघ जाताना दिसली. (त्यांच्या विशिष्ठ आकारावरून ते ओळखता येतात)

हा पाठलाग मस्त असतो. किंबहुना तोच मस्त असतो. असंही लिहिलं गेलंय तेवढच आपल्या वाट्याचं असतं. पण ह्या प्रवासाची सवय झाली कि काय मिळालं हे तितकंसं काउंट करायची गरजच उरत नाही. Chasing is more important. Isn't ?

No comments:

Post a Comment