Sunday, August 23, 2015

माझी खाद्यसंस्कृती


आषाढातली अशी संततधार कोसळू लागली कि मला विविध खाद्यपदार्थांचे आपसूकच वेध लागतात. मे महिना एकूणच निवांत गेलेला असतो. शाळा कॉलेजच्या जीवनात सुट्ट्यांमुळे आणि आता कोर्टालाही सुट्टी असते त्यामुळे निम्मं काम तरी कमी असतं. आणि आंब्यांच्या सिझन मध्ये आमरसा खेरीज दुसरं काहीही करावं लागतही नाही आणि इच्छाही होत नाही. आंबे आणि आंब्याचा रस. एकदा का पहिल्या आंब्यांचा आणि रसाचा देवाला नेवेद्य दाखवून झाला कि मग कोणाचाही विचार न करता आपण आणि आंबे. नाही म्हणायला कैरीचे काही पदार्थ आणि अगदीच गेला बाजार mango मिल्क शेक आणि शेवटी शेवटी साखरांबा, गुळांब्याच्या बरण्या भरल्या जातातच. पण अगदी येता जाता. स्वैपाकात अशी टाळाटाळ करण्याचे दिवस संपले कि मग मलाही चुकल्याचुकल्यासारखं होतं आणि एकेक पदार्थांची आठवण व्हायला लागते.  
आषाढात सगळ्यात पहिल्यांदी आखाड तळायचा म्हणून एकदा एखादं तिखट तळण आणि लाल भोपळा आणि गुळ घालून केलेले भोपळघारगे होऊन जातात. पूर्वी आई आणि तिच्या मैत्रिणी कांदे नवमी करायच्या. तेंव्हा कांद्याच्या पदार्थांची रेलचेल असायची.  आता ती कधी होऊन जाते ते कळतही नाही आणि अर्थात आता कांदा लसूण  असं काही श्रावण असला तरी पाळायला जमत नाही.  मात्र वाढत्या पावसाबरोबर कांद्याची भजी किंवा कांदा घालून केलेले भाजणीचे वडे हे अगदी नित्यनेमाने केले जातात. आणि मग सगळ्यात हवाहवासा दिवस. दीप अमावास्या. बाजरीची भरड काढून आणि काणिकेमध्ये गुळ घालून केलेले इडलीच्या कुकर मध्ये वाफवलेले दिवे, तेही भरभरून तूप घेऊन किंवा कुस्करून दुधात भिजवून. आणि बरोबर फक्त बटाट्याच्या भाजी. अहाहा! वर्षभर ह्या दिवसाची मी आवर्जून वाट बघत असते. सगळे जुने पुराणे दिवे घासून लखलखीत करून त्यांना आराम द्यायचा दिवस. आजकाल बिचार्यांना आरामच असतो आणि बल्बची काही आपण पूजा करत नाही. असे कितीतरी दिवस आपण संकल्पनात्मक साजरे करतो. अर्थातच संस्कृती जपली गेलीच पाहिजे आणि खाद्यसंस्कृती तर नक्कीच अशा विचाराने माझं खाद्यवर्षाचं कॅलेंडर आषाढ महिन्यापासून  सुरु होत.  
श्रावणात तर मज्जाच मज्जा! नागपंचमीला पुराणाची  फारशी  (मला) आवडत नाहीत म्हणून गुळखोबऱ्याचं सारण करून केलेली दिंड आणि वर ओतलेली साजूक तुपाची धार. नारळी पौर्णिमेचा नारळी भात, स्वातंत्र्यदिनी आणलेल्या जिलेब्या, अष्टमीला कालवलेला दही पोह्यांचा काला, श्रावणी शुक्रवारी माम्या मावश्या ह्यांच्या घराची आमंत्रणं आणि ‘तुला कोण आयत देणार’ असं म्हणत म्हणत त्यांनी वाढलेल्या गरम गरम पुरणाच्या पोळ्या, मग जवळपास ३-४ मंगलागौरींची आमंत्रणं आणि मंगळागौरीचा एक टिपिकल पुणेरी  मेनू म्हणजे भाजणीचे वडे आणि मटकीची उसळ, शुक्रवारच्या जिवतीच्या पुरणाच्या औक्षणानंतर ताम्हणातला तुपात भिजलेला पुरणाचा गोळा ह्या सगळ्याने माझा श्रावण महिना अगदी समृद्ध होऊन जातो. मग शुक्रवारच्या ऐवजी रविवारी घरी काम करणाऱ्या मावशींनाच जेवायला बोलावलं आणि खरोखर ज्यांना कधीच आयत जेवायला मिळत नाही त्यांच्या चेहेर्यावरच समाधान बघितलं कि माझाही श्रावण महिना समाधानाने पार पडतो.
गणेश उत्सवाच्या धामधुमीत आई करते ती हरतालिका आणि ऋषीपंचमी काळाच्या ओघात माझ्याकडून मागे पडली तरीही ह्याची निदान एक आठवण तरी होऊन जातेच. तळणीचे आणि उकडीचे मोदक एकेकदा होऊन जातातच पण गणपतीत मागच्या वर्षी केलेल्या पनीर आणि डेसिकेटेड कोकोनटच्या बॉल्सचं इतकं कौतुक झालं कि मला खात्री आहे ह्यावर्षी गणपतीही त्याची आवडीने वाट बघत असेल. मला हीसुद्धा खात्री आहे कि सारखंच गोड खाऊन कंटाळलेल्या गौरीं आणि गणपतीने मिळूनच  त्यांच्या मेनूमध्ये अळूच्या वड्या, वाटली डाळ, घोसाळ्याची भजी, गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी साताळी डाळ हे पदार्थ ठरवले असणार!
गौरी गणपतीची धामधूम संपली कि एखाद्या समंजस गृहिणीसारखी देवी घरातल्या गृहिणीला १५ दिवस हक्काची रजा देते आणि नवरात्रात येते तेही  फुलोऱ्याव्यतिरिक्त काही विशेष मागणी न घेता.  आजकाल कोजागिरीला चंद्र दिसो न दिसो पण आकाशात कुठेतरी असणाऱ्या त्याला मस्त आटवलेल दूध बाल्कनीमध्ये ठेवल्याखेरीज आपल्या ओठाला लावावसंच वाटत नाही.
ह्या सगळ्या धामधुमीत मध्ये कधीतरी नवऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी एखादा थाई, मेक्सिकन पदार्थ होऊन जातो आणि त्याला घेतलेल्या महागड्या गिफ्टच्या निमित्ताने का होईना आम्हाला एखाद्या grandgrand हॉटेल मध्ये grand पार्टी मिळते. आता ह्यावर्षी दिवाळीला काही फारसं करायचं नाही, असही सगळच एकदम खाल्लं जात नाही, आई वगैरे देतच असते असं मनाशी बजावून ठेवते मग लक्ष्मीपूजनाला लागतात म्हणून अनारसे आणि लाडू मस्ट. मग वेगळा आयटम म्हणून चोकोलेट बॉल्स, चीज शंकरपाळे, पटकनच तर होतो म्हणून चिवडा, करंज्या करणं चांगलं असतं म्हणून करंज्या आणि बघू तिच्यापेक्षा माझ्या छान कुरकुरीत होतात हे दाखवण्यासाठी चकल्या आणि मला करायला आवडतात म्हणून चिरोटे  असा घाट घातलाच जातो. मध्ये कधीतरी नणदेबरोबर फोन झालेलाच असतो मग ती काय करतीये ह्याचा अंदाज घेऊन पुन्हा पदार्थ वाढवले जातात. J
मग एकदा खंडेराय येऊन वांग्याची भाजी, कांद्याची पात, भाकरी खाऊन जातात. ह्या सगळ्यानंतर खरंतर हरे रामा म्हणावसं वाटतं पण डिसेंबर महिना चालू असल्याने ओह जिझस असं म्हणून एखादा फ्रुट केक केला आणि सॉक्समध्ये काही चॉकलेट्स आणि किरकोळ खेळणी लपवून ठेवली कि जरा हुश्श व्हायला होतं. खरंतर हुश्श एवढ्याच साठी कि अगदी ह्याच वेळी ह्याच दिवशी हे केलंच पाहिजे असा अट्टाहास नंतर राहत नाही. पण मग स्वतःची आवडनिवड सुरु होते. तोपर्यंत थंडी एकदम ऐन बहरात असते. मग मलाच म्हणून हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्याची आठवण येते. चर्र लसणाची फोडणी देऊन, आधण ठेवून त्यात पिठाची कणिकेच्या हाताने केलेल्या चकल्या सोडायच्या आणि गरम गरम भाकरीबरोबर खायच्या.  हे सगळं झाल्यावर  अधे मध्ये चुईंगगम सारख्या चिवट किंवा भुगा होणाऱ्या तिळाच्या वड्या वगैरेकडे मी फार लक्ष देत नाही. पण एनिवर्सरी निमित्ताने पुन्हा एकदा काहीतरी अभारतीय डिशचे प्रयोग सुरु होतात.  मग जरा आरामाचे थोडेसे ‘अच्छे दिन’ जवळ येतात. तरी चैत्राची चाहूल लागली कि आपोआप वाढत्या उन्हाबरोबर लोणची, तक्कू, मेथांबा ह्यांची आठवण व्हायला लागते. चैत्रगौरीच्या निमित्ताने कैरीची डाळ, पन्हं, शेवयाची खीर होतच राहते.  
हे सगळंच आई करायची तेंव्हा अर्थातच जास्त आल्हाददायक असायचं. आईच्या हातची चव आणि स्वतःला कष्ट नाहीत.  आता कधी कधी खूप कामं चालू असताना, समज्ञा माझी मुलगी खूपच लहान असताना, आजारपण, क्लाएनट्सचे फोन कॉल्स, राहिलेलं ड्राफ्टीग आणि आडवारी येणारे सण.... कधी कधी जीव मेटाकुटीला येतो. आणि नाही केलं तर विचित्र रुखरुख लागून राहते. अशामध्ये आईने आणि आज्जीने केलेले पदार्थ आठवत राहतात आणि मग वाटतं आपल्याला हे सुख आपल्या आईने आणि आज्जीने दिलं मग आपल्या मुलीसाठीही आपण करायलाच पाहिजे.
असेही ह्या सगळ्याच पदार्थात भरभरून प्रोटीन्स, विटामीन्स, मिनरल्स असतात. त्या त्या वेळेला ह्या ज्या योजना पूर्वजांनी केलेल्या आहेत त्या किती विचार करून केलेल्या आहेत. अगदी दिवाळीला तळणीचा फराळ हा थंड हवेत चांगला असतो जो उन्हाळ्यात खाऊ नये म्हणतात. अर्थात हे सगळं आपल्याला आई आणि आजीकडून फ्री रेडीमेड मिळत असताना आपल्याला मात्र कळायला कोणीतरी ऋजुता दिवेकर यावी लागते, मग तिने करीनाला गाईड केलेलं असावं लागतं, मग एखादं पुस्तक लिहावं लागतं, मग ते आपण विकत घेऊन वाचावं लागतं! असो....
हे सगळं सण समारंभ म्हणून केलं जातं. पूर्वी देवाच्या भीतीने ‘हे लागतंच’ अशा हेतूने बायका करत पण आता तर आपल्याला मनापासून वाटतं देवाला काय एक नमस्कारही पुरतो. मग हे कुळधर्म, कुळाचार, हे सोपस्कार, हे नेवेद्य कशासाठी? पण मी माझ्यापुरतं तर बघून ठेवलाय हि व्यवधानं असतात, ह्यानंतर हे आहे, त्यानंतर ते येतं, आता असं करायचं, आता तसं करायचं, इतकच काय पण ‘ह्या वर्षी आमच्याकडे काही करायचं नाहीये’ ह्या विचारानेदेखील  येणारी व्यवधाने माणसाला गुंतून ठेवतात. हे सगळं नसेल तर माझं आयुष्य किती रिकामं रिकामं होऊन जाईल ह्याची मी कल्पनाही करू शकत नाही. रिकामं डोकं सैतानाचं घर ! आणि मग किती वेळ मॉल्स मध्ये फिरून निरर्थक घालवेन माहित नाही! कामाच्या व्यवधानातूनही हे सगळं करायला मला आवडतं. आणि संस्कृती तर जपलीच पाहिजे ना? मग माझ्यावर खाद्यसंस्कृतीसारखी creative गोष्ट जपायची जबाबदारी असेल तर अगदी वॅनिला विथ हॉट चॉकलेट सॉस !

No comments:

Post a Comment