मी आणि माझी पोळीवाली बाई (बाण न सुटणारे धनुर्धारी)
आईकडे असताना कधी कुकर लावल्याचेही आठवत नाही. पोळ्या करणे तर फारच दूरची
गोष्ट. (काय करणार पुण्याच्या मुली !!!!
त्यांना अज्जिबात कामाची सवय नसते.)
लग्न झाल्यावर काही महिन्यातच पोळ्या करायला एका मावशींना ठेवलं. काही वर्ष
त्यांनी काम केलं आणि नंतर मध्ये एक gap घेऊन आता पुन्हा माझ्याकडे यायला लागल्या.
कधीतरी पैसे वाढवून दिले असतील पण आई गेल्या, नंतर नाष्ट्याला वेगळा पदार्थ करायला
लागले तशी पोळ्यांची संख्या कमी होत गेली
त्यामुळे पैसे वाढवून द्यायचा फारसा पश्नच नाही आला. अधून मधून दिलेही. पण तरिही त्यांचं
पैसे वाढवून मागायचं सत्र अधून मधून चालूच
असतं. पण सध्या ते तितकंसं बरोबर नाही हे त्यांनाही माहित आहे. त्यामुळे सगळंच कसं
बेताबेताने चाललंय.
आता दोन्हीही बाजूने खूप फरक पडलेत. आम्ही एकमेकींना adjust झाल्या आहोत.
सकाळी सकाळी त्या हव्या तेंव्हा चहा करून घेतात, सुट्ट्यांचं मी काही म्हणत नाही.
त्यांच्या मुलांना काय काय देत असते. थोडं जरी वेगळं काम करून घेतलं, पुरणपोळ्या
करून घेतल्या तरी त्याचे वेगळे पैसे देते.
कित्येक वेळा रविवारी तर त्यांना सुट्टीच असते. त्यांना सवाष्ण म्हणून जेवायला
बोलावते. आणि कितीतरी. काम सोडायची तर इच्छा नसावी त्यांना. मी मनाशीच चाचपणी करत
राहते.
त्यांना हेही माहितीये आता मीही काम कमी केलय, वेळच आली आणि त्यांनी काम
सोडूनच दिलं तर मी माझी माझी करू शकते. आता कामाची सवयही झालीये. तितकंसं अडणार
नाही.
मग त्या कुरुकुरी करत बसतात. सोमवार ते शनिवार पोळी भाकरी पैकी एकाच सांगत जा,
पराठे फक्त शनिवारी किंवा रविवारी वगैरे! खूप वेळ जातो. परवडतच नाही. काम खूप
झालीयेत! आता गावाकडच्या शेतीचे पैसे मिळणार आहेत मग कामं कमी करणार वगैरे वगैरे !
पण मला माहित आहे त्या काम सोडणार नाहीत !!!
मग दहशत निर्माण करण्यासाठी मीही
स्टार सिजे वरून एक रोटी मेकर ओर्डेर करते. तो येतो ! मग त्याची ट्रायल होते. ते
सगळंच प्रकरण फसलेलं असतं. त्यातून ना धड खाकरा ना धड भाकरी असं काहीतरी बाहेर
पडून खूप सारी कणिक वाया जाते. डोक्याला हात लावायची वेळ येते. नवरा तर नवरा पण
एवढीशी लेकही magic mop आणि रोटी मेकर घेतल्याबद्दल ओरडते. तरिही तो रोटी मेकर मी
ओट्यावर ठेवते. मला माझ्या स्वबळाची पूर्ण जाणीव असते. मावशी विचारतातच, मग मीही
सांगते कि किती soft पोळ्या होतात त्यामध्ये म्हणून. मग त्या रविवारी दांडी
मारतात. त्यांनाही आपण स्वाभिमानी आहोत असं दाखवायचं असतंच.
मी सोमवारी रोटी मेकर माळ्यावर टाकते. त्या आल्यावर त्यांच्या हातच्या
पोळ्यांची तारीफ करते. तोपर्यंत त्यांचा स्वाभिमान आणि माझा स्वबळाचा देखावा
मस्तपैकी सादर झालेला असतो. साधारण २-३ महिने आमच्या दोघींचाही प्रत्यंचा पूर्ण
ताणलेला धनुर्धारी झालेला असतो. ताणतो ताणतो पण तो सोडत कोणीच नाही.
शेवटी २-३ महिन्यांनी मी पैसे वाढवते! त्याही गुपचूप आठवड्याच्या दिवसातही
पराठे वगैरे करायला लागतात, भाजी चिरून देऊ का म्हणतात! अशा प्रकारे आमची युती
किंवा आघाडी (काय फरक पडतो काहीही म्हटल्याने) पुढची काही वर्ष किंवा महिने तरी स्वाभिमानावर
आणि स्वबळावर चालू राहते.
(तर मग असाच बाण न सुटणारा धनुर्धारी आमच्या घराला लाभला तसाच चारही पक्षांना आणि
तुम्हा आम्हास लाभो ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.)
No comments:
Post a Comment