असं का होतं कळत नाही. तरल आणि संवेदनशील म्हणून एखादी कलाकृती बघायला जावी. खूप आवडेल अशा पूर्वग्रहाने जावं आणि सपशेल आवडू नये.
कोर्ट आणि किल्ला पिक्चर्स मध्ये काहीच नाट्यमय नाही किंवा किती त्या रिकाम्या जागा असा बऱ्याच जणांचा सूर होता आणि ठीक आहे तो तसा असूही शकतो कारण होत्याच तिथे रिकाम्या जागा. पण कवितेच्या जगात तुम्ही एखाद्याला घेऊन जाता. अतिशय सुंदर कविता निवडता त्या एखाद्या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करता सगळं ठीक आहे पण म्हणून “किती दाखवायचं” ह्यावर जरातरी मर्यादा पाहिजे. कुठेतरी ‘कविता’ बघायला येणाऱ्या माणसावर विश्वास ठेवून ती सादर करायला पाहिजे. म्हणजे ‘एक होता काऊ’ भागात किती वेळा कावळा दाखवावा ह्याचा काहीतरी विचार करायला हवा होता. म्हणजे काऊचं घर होतं शेणाचं, चिऊचं मेणाचं हे झालं, मग त्याचं नाव कवळ्या हे झालं, मग अर्धा तासाच्या कथेत दर दोन सेकंदांनी कावळे दाखवून झाले, मग सतत कावळ्याचा आवाज दाखवून झालं, मग प्रत्येक वेळेस त्याचं कावळ्याकडे बघून वाईट वाटून घेणं झालं, तिच्या वडिलांनी मित्रांनी त्याला कावळ्याच्या उपमा देऊन झालं, त्याने रागावून कावळ्यांना मारणं झालं हे सगळं कमी होतं म्हणून कि काय भरीस भर म्हणून तिनं ‘माई न माई मुंडेर पे तेरे बोल राहा है कागा’ ह्यवर नाचही दाखवून झाला. आता हे सगळं दाखवल्यानंतर कावळा एक रूपक म्हणून प्रतिक म्हणून काय उरत? त्यात काव्य काय उरत? मीही काळीच आहे पण म्हणून वर्षाचे ३६५ दिवस मी कावळ्याकडे बघून घालवत नाही. J
J
एवढ्या विरुद्ध व्यक्तींची प्रेमकथा दाखवताना ती CONVINCING वाटण्यासाठी “काहीतरी” दाखवायला पाहिजे असं वाटतं. तिने त्याच्याकडे आकर्षित होताना निदान त्याचा एखादातरी स्पार्क ठळकपणे दाखवला गेला असता तर ती कथा आपली वाटली असती.
बैल कवितेची कथासुद्धा अशीच ! अरे बैल कवितेमधून म्हणतोय कि तुम्ही मला माझ्या आईपासून तोडतल, तिचं दूध तोडलत, ते विकलत, माझा लाखमोलाचा समागम माझ्यापासून हिरावून घेतलात आणि तरिही मी तुमच्या शेतात राब राब राबलो आणि तरी तुम्ही आत्महत्त्या करता. अशा कवितेसाठी पूर्ण पिक्चरभर जर त्या शेतकर्याने आत्महत्या करण्याची यथायोग्य कारणमीमांसा दाखवत बसलात तर सहानुभूती शेतकऱ्याला जाणार कि बैलाला?
दिले नादान कथेमध्येही पूर्ण कथेभर एक गहिरी उदासी दाखवलीये, यशाच्या एका अत्त्युच्च टोकावरून उतारवयात मिळणारे दुर्लक्ष ह्यामुळे येणारी उदासी ! शेवटीही तीच, फक्त मध्ये ती गायिका म्हणून जाते कि आपण ते सुंदर दिवस बघितले, यश कीर्ति, टाळ्यानचे गजर अनुभवले मग आता इतरांची वेळ आहे. असं म्हणणारी व्यक्ती पूर्णकाळ उदास असू शकते का किंवा जी व्यक्ती एवढी उदास असते ती असा काही विचार करू शकते का? CONVINCING नाही वाटत.
अतिशय सुंदर अभिनयाने जिवंत करणाऱ्या वीणा जामकर आणि संदीप खरेच्या कथेतही ‘उदासीत ह्या कोणता रंग आहे’ ह्यामध्ये तरलतेचा अभाव वाटला. ‘मित्रा’ संदर्भात खरे कळल्यानंतर विन्याला DISGUSTING वाटते. ते त्याच्या परिने तेंव्हा बरोबर असले तरी मग पुढे येणारी ‘उदासीत ह्या कोणता रंग आहे’ ही तरल भावना निष्प्रभ ठरते. मित्रा चं पुढचं वागणं आणि शेवटी अहमदाबादला जाते म्हणणं हे तर त्या तरलतेला अजून ओरखडा ओढून जातं. तिचं संयत वागणं दाखवून
तिच्या तोंडी ही कविता दिली असती तर जास्त प्रभावी वाटली असती असं वाटलं. संदीप
आणि वीणा जामकर मात्र प्रकर्षाने लक्षात राहिले. अतिशय सुंदर अभिनय.
चार कवितांवरून चार छोट्या वेगवेगळ्या कथांचा सिनेमा बनवणं, कविताही, कलाकार सगळंच सुंदर असणं आणि तरी अशा चुका जाणवल्या कि त्यातली तरलता संपून जाते मग हास्यास्पद होते त्याहीपुढे ती कलाकृती होत नाही. तरी बर चांगल्या थेटरात बघितला. नाहीतर लोकांचे ताशेरे आणि टवाळक्या बघून अजूनच त्रास होतो.
(मी मला जे भावलं ते लिहिलंय. ते बरोबरच असेल असं नाही. त्यामुळे मोठ्ठं लिहिलं असेल तरी हे परीक्षणही नाही)
No comments:
Post a Comment