Sunday, August 23, 2015

शिप ऑफ थिसस

एखादं जहाज मोडकळीला आलं आणि त्याचे बरेचसे भाग नवीन भागांनी बदलले गेले तर त्याला ते 'जुनं जहाज' म्हणता येईल का ? त्याच्या आधीच्या भागांपासून ते दुरुस्त करून जर दुसरं जहाज बनवलं गेलं तर त्यातल्या कोणत्या जहाजाला 'मूळ जहाज' म्हणता येईल? तत्वज्ञांचा एक आवडता paradox. "Ship of Theseus" हा अशा कोणत्याही तात्विक मुद्द्यावर भाष्य किंवा खलबतं न करताही वाचकाला त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार एक सुंदर वैचारिक अनुभूती देतो.

किरण रावचा धोबीघाट बघितल्यानंतर तिने present केलेला म्हणून बघायची खूप उत्सुकता होती. आणि असा पिक्चर present करून तिने पुन्हा एकदा आपल्या वेगळेपणाची खात्री करून दिली असं वाटलं.

तीन वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण सिनेमा बघतो आणि त्यातलं समान सूत्रही आपल्याला नंतर सापडतं. सिनेमा फिरत राहतो स्वत्व, त्याची जाणीव, शोध ह्याभोवती. खरा माणूस, त्याला स्वतःची असणारी ओळख, ती तरी खरी असते का? तो स्वतःला जो समजतो, तो जगात जसा वागतो खरच तसाच असतो का? आणि गंभीर, अनाकलनीय प्रसंग आल्यावरही तसाच वागतो का? ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशीही relate करत राहतो. आणि खास शेवट नसूनही आपल्या मनात विचारांचा कल्लोळ उठतो.

अवयव रोपण हे सिनेमातल्या तीनही पत्राची एक सामाईक कथा आहे. सुरवातीलाच एक अंध छायाचित्रकार जी फक्त आवाजांच्या मदतीने अतिशय सुंदर फोटो काढत असते. तिच्या स्वतःच्या न बघितलेल्या फोटोंबद्दलही ती अतिशय गंभीर आणि दक्ष असते. अचानक तिच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होऊन तिला दृष्टी येते.

एक जैन साधू, त्याच्या आश्रमात साधेपणाने त्याचे काम करत जगत असतो. प्राण्यांवर अमानुषपणे होणाऱ्या औषध्यांच्या आणि सौंदर्यप्रसाधनांच्या चाचाण्यांविरुद्ध तो पिटीशन दाखल करतो. विरुद्ध कंपनीकडून प्रचंड पैश्यांची ऑफर येऊनही तो त्याची मुल्ये आणि तत्व ह्यांना जपत राहतो. अचानक आजारी पडल्यावर डॉक्टर लिवर सिरोसीस चे निदान करतात आणि पुनर्रोपणाचा पर्याय सुचवतात ज्याला तो नाही म्हणतो आणि औषधे घ्यायलाही नकार देतो.

एक तरुण मुलगा ब्रोकर म्हणून बऱ्यापैकी पैसे कमवून निवांत आयुष्य जगत असतो. फक्त पैसे कमवावेत आणि चार चौघांसारखं आयुष्य जगता यावं एवढीच त्याची माफक अपेक्षा असते. त्याची आज्जीला त्याने जाणीवपूर्वक आणि समृद्ध आयुष्य जगावं असं वाटत असतं. स्वतःच्या किडनी रोपणाच्या वेळेस त्याला किडनी चोरीच्या घटना हॉस्पिटल मध्ये होताहेत अशी जाणीव होते. आधी स्वतःची तर किडनी चोरीची नाहीये ना ह्याची खात्री करतो आणि त्या शोधकार्यात सदर व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतो. एखाद्या संवेदनशील व्यक्तीला ज्या अनुभवला नित्याने सामोरे जावे लागते तो अनुभव त्याला येतो. परत येउन आज्जीला म्हणतो "बस आगे कुछ नाही हो पाया" आज्जी म्हणते "बस इतनाही होता है" आहा ! how true ! इतनाही होता है! …….

प्रत्येक पात्राची स्वतःची त्याला स्वतःला असणारी किंवा जगाला असणारी त्याची खरी ओळख ह्या प्रसंगांमधून मिटते आणि वेगळी ओळख सापडते. माणसं बदलतात. स्वतःच तत्वज्ञान कितीही खोल असेल तरीही अंतर्मनाला माहित नसलेल्या गोष्टी वर येतात. बदलवून टाकतात. आपली आपल्याला ओळख करून देतात.

शेवटच्या दोन मिनिटांसाठी त्यामधली पात्रं एकत्र येतात आणि ज्यांनी पुनर्रोपण उपलब्ध करून दिलेलं असतं अशा संस्थेने आयोजित केलेली एक छोटीशी फिल्म बघत आपापल्या कुवतीनुसार स्वतःचा शोध घेतात. आपण विचार करत राहतो.

कमी संवाद आणि अतिशय बारकाईने टिपलेले तरल दृश्यांचे छायाचित्रण हे ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य. ह्यासाठी आणि ज्यांना समांतर पिक्चर्स बघायला आवडतात त्यांनी बघायलाच हवा असा पिक्चर.

No comments:

Post a Comment