Sunday, August 23, 2015

निर्भेळ आनंदाची गोष्ट


काही काही गोष्टी ना झाल्यात त्या झाल्यातच ! त्याला काही करूच नाही शकत. म्हणजे बघा निर्भेळ आनंद! आता एकदा का पुढच्या पातळीच्या आनंदाची किंबहुना मनोरंजनाची सवय झाली कि त्याचा आधीचा आनंद नको वाटतो. अगदी कितीही जुन्या आठवणीत रमलो, साधी सुट्टी, चार आण्याचे दाणे, आठ आण्याची कुल्फी, सायकलवरून चक्कर, प्रभात ला पाच रुपयात पिक्चर, दोन रुपयाचा गजरा, छायागीत मध्ये चार सहा गाण्यात लागलेलं एखादं चांगलं गाणं, जुन्या मालिका, नव्वदच्या दशकातल्या जाहिराती, डबे घेऊन केलेल्या एकदिवसीय सहली आणि झाडाच्या सावलीत केलेली जेवणं हे सगळं कितीही सुंदर असलं आणि आपण कितीही nostalgic झालो तरी आता बदललो आहोत ते आहोतच. कुठेतरी डीडी भारतीवर लागणारी जुनी मालिका बघितली तरी त्यातल्या टेक्निकल गोष्टींमुळे मन रमत नाही, ट्रीप ला डबे घेऊन जाऊयात किंवा तिथे जाऊन खिचडी वगैरे करूयात ही कल्पना नामशेष झालीये. multiplex शिवाय सिनेमा बघायचा कंटाळा येतो. कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत! ह्यातल्या काही गोष्टी आपण केल्या जरी तरी आपणही बदललो आहोतच. अमान्य करण्यात काय अर्थ आहे.
दरवर्षी फटाक्यांचा सेल आणि फटाक्यांचा आवाज कमी झालाय अशी बातमी येते. खूप जण पर्यावरण जागृती झालीये म्हणून लोक कमी फटाके उडवतात असं म्हणतात. पण मला वाटतं कि फटाके उडवण्यातली मज्जा आणि मनोरंजन मुलांना आवडेनासं झालंय कारण मनोरंजनाची इतकी साधनं उपलब्ध आहेत त्यात फटाके कधीच मागे पडले. तशीच मज्जा सर्कशीची. इतके विडीओज उपलब्ध आहेत कि सर्कस खूपच मागे पडली.
असो तेल घडीभर झालं. तर परवाच्या रविवारी घराबाहेर पडताना नवर्याला म्हटले. काय रे आज तर बाहेर जाऊन काही खायचं नाहीये, मॉल्समध्ये जायला तुला आवडत नाही, काही खरेदी करायची नाहीये आणि पिक्चरही बघायचा नाहीये तर काय करायचं बाहेर जाऊन ? म्हणजे खरंच कधी कधी रविवारी बाहेर पडून काय करायचं हा खरंच प्रश्नच असतो. तर ओरडला. तुला निर्भेळ आनंद घेताच येत नाही का म्हणाला. म्हटलं अरे आता काय आहे ते आहे. तू कधी मला गजराही घेऊन नाही दिलास आता त्या सो कॉल्ड “निर्भेळ आनंदातली” गेली मज्जा ! मग बाहेर पडत पडत त्याच्या त्या निर्भेळ आनंदावर मी कोट्या करत राहिले.
मग पुलं देशपांडे उद्यानात गेलो तर प्रचंड गर्दी. झाडाचं पानही हलत नव्हतं. कंटाळा आला. त्या गर्दीने जीव नकोसा झाला. बसायलाही जागा नव्हती. बाहेर पडलो मग सातारा रोडला एकांना भेटू म्हटलं पण तिकडे उशिरा जायचं होतं मग वेळ काढण्यासाठी सारसबागेत जाऊ म्हटलं. मला पूर्वी सारसबागेत जायला आवडायचं. मी खूप धार्मिक नाही तरिही तळ्यातल्या गणपतीला गेलं कि मला खुपदा छान वाटलेलं आहे.
त्याही बागेत प्रचंड गर्दी होती. पण गर्दी व्यतिरिक्तही त्या बागेची अवस्था बघून मी सुन्न झाले. बागेचा एक सेक्शन बंद ठेवला होता. पूर्वी पथारीवाले, छोट्या मोठ्या गोष्टी, भेळ, खेळणी विकणारे त्यातल्या सडकेवर असायचे पण बघितलं तर कितीतरी भेळीवाल्यांनी आपली पथारी गवतावर पसरली होती आणि तिथेच त्याची विक्री चालू होती. संपूर्ण गवतावरकचर्याचे कागद आणि भेळीचा गालीचा पसरला होता. त्या ओल्या कोरड्या भेळीवर नाचतच लहान मुले खेळत होती. पूर्वी उन्हाळ्यात बागेत गेल्यावर कांदा कैरी आणि मोगरा असा जो एकत्र वास असायचा तो मला खूप आवडायचा. पण हे horrible च होतं. एकतर बिलकुल वाऱ्याशिवाय तो भेळीचा वास भरून राहिला होता नि भेळ पायाखाली अक्षरशः तुडवली जात होती ते वेगळंच. पूर्वी त्या बागेत क्वचित क्वचितच फेरीवाले असायचे पण त्या दिवशी त्यांची संख्या बघून पण मी हबकले. जत्रेपेक्षा वाईट स्थिती होती. तितेच खोट्या वाघावर बसून फोटो काढून देण्याचे प्रकार चालले होते. एकूण तिथे जाऊन मन रमण्यापेक्षा उद्विग्नता आली. गप्पा मारण्याचे तर दूरच. लेकही कंटाळली.
शेवटी एकदाचे तिथूनही निघालो. ‘अभिषेक’ ला आलो. गर्दी होतीच पण ओळखीची आहे असं वाटलं. शांतपणे मेनुकार्ड न्याहाळत बसलो. ह्याला म्हटलं ‘बघ फार निर्भेळ निर्भेळ आनंद केलंस ना! म्हणून असा भेळयुक्त आनंद वाट्याला आला. आजकाल भेळ मिळेल तिथे अशा निर्भेळ आनंदाची guarantee मिळेलच असं काही नाही.’

No comments:

Post a Comment