Sunday, August 23, 2015

ओतूर

ओतूर

श्रावण महिना लागला कि आमच्या गावाची खूप आठवण येते. आणि श्रावणी सोमवारी तर खासच. कारण श्रावणी सोमवारच्या तांदळाच्या पिंडी.

गावाच्या वेशीबाहेर बऱ्याच अंतरावर शंकराचं एक मोठं पुरातन मंदिर आहे. नदीच्या तटाला हे कपर्दीकेश्वर मंदिर आणि तिथूनच ८-१० पायऱ्या चढल्यावर तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्यमहाराजांची महाराष्ट्रातल्या तीन जिवंत समाध्यांपैकी एक जिवंत समाधी आहे. ते वातावरणाच भारलेलं आहे. गोलाकार वळण घेत जाणारी मांडवी नदी. पुढच्या आदिवासी पाड्यात जाणारा त्यावरचा एक पूल, आजूबाजूला सदोदित हिरव्यागार असणाऱ्या केळीच्या बागा, शेती, नदीच्या काठावरची झाडं आणि गावापासून लांब असल्याकारणाने भरून राहिलेली एक निरव शांतता. मधूनच कपर्दीकेश्वराच्या देवळात घुमणारी मोठी घंटा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांचा किंवा त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज.

आपलं गाव म्हणून एक ओढ असतेच पण वडिलांनी जीर्णोद्धार केलेलं गावातलं आमचं सुमारे १०० वर्षांपूर्वीच गणपती मंदिर आणि कापर्दीकेश्वराच्या जवळ असलेली खापर पणजोबांची समाधी अशा गोष्टींमुळे अधिकच जोडलं गेल्यासारखं वाटतं. आणि आणखी एक म्हणजे माझे  आवडते लेखक आणि एक ग्रेट माणूस अनिल अवचट ह्याच गावचे. त्यांच्या लिखाणात येणारे ओतूरचे संदर्भ, त्यांचं बालपण आणि एकूणच त्यांचं काम आणि लिखाण ह्याने वाचण्याच्या सुरवातीच्या काळात मी अगदी समृद्ध झाले होते. आजही आहे.

कपर्दीकेश्वरामधून चैतन्यमहाराजांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. बाजूला वाढलेली गुलमोहराची झाडं त्यावर हिरवंलाल आच्छादन पांघरून देतात. तिथल्या कट्ट्यावर बसलं कि serene आणि tranquility म्हणजे काय हे समजून जातं.

पण श्रावणात मात्र एकदम उलट वातावरण असतं. काठावर जत्रा भरते. कुस्तीचे आखाडे असतात. कसले कसले stalls लागतात. तर श्रावणातल्या रविवारच्या संध्याकाळी ज्यांनी आदल्या वर्षी नवस बोलला आहे ते नवसाच्या तांदळाची कपर्दीकेश्वरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढतात. मग रविवारी मध्यरात्री मंदिरातले गुरव मंदिराचंदार लावून फक्त तांदूळ ओततात आणि त्याने एकावर एक अशा तांदळाच्या पिंडी बनतात. पहिला सोमवार असल्यास एक आणि त्याप्रमाणे. अशा पिंडी बनताना कोणी बघितल्यास त्याचे डोळे जाऊन अंधत्व येतं असं म्हणतात. ह्या पिंडी खूप प्रसिद्ध असून महाराष्ट्रातून कुठून कुठून लोक दर्शनाला येतात.

ह्याबाबत अनिल अवचट एक आठवण सांगतात. सामाजिक कार्याची सुरवात करताना त्यांच्या कंपूमधलं कोणीतरी ही अंधश्रद्धा मोडून काढू असं म्हणालं. त्यावर ह्या प्रथेमुळे कोणाचं नुकसान होत नाहीये किंवा कोणाला लुबाडलं जात नाहीये, फारफार तर थोडासा तांदूळ गुरव घेत असतील ह्यापलिकडे काही नाही म्हणून पिंडीचं रहस्य उकलवण्यास मनाई केली. घरांना दारे नसणं, कड्या नसणं, कौलं न घालणं अशा कितीतरी प्रथा कोणाच्याही शोषणाशिवाय अजूनही रूढ आहेत. आजकालच्या पिढीला तर कोणत्याही ‘चमत्काराशिवाय’ ह्या गोष्टी रूढ आहेत हेही माहित आहे तरीदेखील त्या जपल्या जाताहेत. हे चांगलं कि वाईट हा ज्याच्या त्याच्या धार्मिक भावनेचा आणि श्रद्धेचा भाग.

आजही खूप धामधूम चालू असेल. पहिल्या सोमवारी एका पिंडीचं दर्शन घ्यायला रांगा लागल्या असतील. शाळांना सुट्टी असेल. मुलं हट्ट करत आई वडिलांना काय काय विकत घ्यायला लावत असतील. मुलांच्या तोंडात पिपाण्या वाजत असतील. गोल चक्रांचे पाळणे फिरत असतील. नवस बोलले जात असतील. पेरण्या पूर्ण होत आल्या असतील. पावसासाठी आर्जवे होत असतील. धार्मिक भावनेने का होईना पण सगळ्या मनोकामना पूर्ण होतील अशी आशा  प्रत्येकाला असेल. ह्या उत्साहाच्या वातावरणात ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशी एक सकारात्मक उर्जा भरून राहिली असेल.

No comments:

Post a Comment