Sunday, August 23, 2015

एमएच १२ – वाय ४१३३.

मध्यंतरी गाडी चोरीच्या संदर्भात एक लेख वाचला त्यावरून मलाही माझी लाडकी एम एटी चोरीला गेली तो दिवस आठवला. ज्ञानप्रबोधिनीत अभ्यासाला जायचे तेंव्हा. ज्ञानप्रबोधिनीच्या समोरच्या गल्लीत गाडी लावली आणि वर गेले. क्लास नव्हता म्हणून तशीच मैत्रिणीबरोबर खाली आले आणि आम्ही झेड ब्रिजवर फिरायला गेलो. बराच वेळाने निघालो. गाडी लावली होती त्या ठिकाणी बघते तर काय गाडी गायब. nनो पार्किंग तर नाहीये ना ह्याची खात्री करून घेतली. घाबरायला तर झालंच. कारण डावी उजवीकडे सगळीकडे गाड्या होत्या. बरोब्बर मधली जागा रिकामी होती. नुकतीच एका मैत्रिणीची गाडी चोरीला गेली होती. मग फरासखाना आणि डेक्कन अशा दोन्ही ठिकाणी मैत्रिणीबरोबर जाऊन आले. दोन्ही ठिकाणी गाडी पोलिसांनी नो पार्किंग म्हणून नेलेली नव्हती. पुन्हा गाडी लावली होती तिथे आले. कोणी चुकून नेलेली आणून ठेवलीये का ते बघायला. आता मात्र चांगलीच टरकले. काय करावं सुचेना. डेक्कनच्या पोलिसांनीच सांगितलं मिसिंग कम्प्लेंट करा म्हणून. नऊ वाजत आलेले. पोलीस स्टेशनला जायची कधी वेळ आली नव्हती. मैत्रिणीला पण घरी जायला उशीर होत होता. एकटीला स्टेशनला जायला भीती वाटत होती. काय करावं कळेना. घरी सांगायची हिम्मत होईना. त्यातून त्या दिवशी बाबा नागपूरला गेले होते. कोणाला मदतीला बोलवावं कळेना.

सगळ्यात आधी मला माझ्या भावाची आठवण झाली. तो भाऊ म्हणजे मानलेला भाऊ. आमच्या समोरच्या बिल्डींग मध्ये राहायचा. असं काही ठरवून मानलं नव्हतं पण लहानपणापासून त्याला राखी बांधायचे मी. त्या काळी मोबाईल्स कुठे होते! त्या दरम्यान त्याचं एका मुलीबरोबर गुफ्तगू सुरु झालं होतं. ती जवळपास एके ठिकाणी रात्री ८.३० पर्यंत पार्ट टाईम नोकरी करायची. तिथून बाहेर पडल्यानंतर ते दोघं अगदी पाच दहा मिनिटं पीवायसी ground च्या मागे पोस्ट ऑफिस वरून जो रस्ता जातो तिथे भेटायचे. अजूनही त्या पूर्ण रस्त्यावर बर्यापैकी अंधार असतो आणि बरीच जोडपी गाड्या उभ्या करून थांबलेली असतात. तो तिथे भेटू शकतो हे मला त्याही प्रसंगी आठवलं. आणि मी प्रभात पोलीस चौकीपासून त्या रस्त्याने त्याला शोधत निघाले. अगदीच विचित्र वाटत होतं पण काही इलाजही नव्हता. चक्क त्या रस्त्यावर तो सापडला ! मी त्याला चल म्हणाले. तिनेही (आता वाहिनी) बिचारीने आपल्या पाच मिनिटातला उरलेला वेळ त्याग केला. आज आठवलं कि हसू येतं.

नंतर पोलीस स्टेशनला गेलो. त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी कम्प्लेंट लिहून घ्यायच्या अगोदर आम्ही दोघेही लहान दिसतोय त्यामुळे आम्हालाच उलट सुलट प्रश्न विचारायला घेतले. हा भाऊ आहे सांगितलं तर कुठला भाऊ मग आडनाव वेगळं का ? तुम्ही कुठे भेटलात? एकत्रच होतात का ? कुठला क्लास बुडवला ? ह्या प्रश्नांनी हैराण होऊन गेलो. बर पोलीस तर पोलीस फक्त गाडी कशी हरवली ह्याच गोष्टीवरून नाही तर हा तुला कुठे भेटला, बरा भेटला ! म्हणून आईनेही सरबत्ती सुरु केली. आता गोष्ट अशी होती कि तो कुठे भेटला हे मी ना पोलिसांना ना आईला सांगू शकत होते. मला गप्पच बसावं लागलं !

त्यानंतर एका ज्योतिषाने गाडी पूर्व दिशेला मिळेल असं सांगितल्याने मी आणि हा आमचा भाऊराया आख्खा नगर रोड फिरून आलो तरी ती काही मिळाली नाही.

ह्या सगळ्याच प्रसंगावरून नको ते पोलीस स्टेशन, नको the भाऊ मानणे असं झालं ! १६-१७ वर्ष झाली असतील पण अजूनही प्रभात पोलीस चौकीवरून ground ला वळसा घालून त्या रस्त्याने जाताना मला हे नित्यनेमाने आठवतं आणि हसू येतं. त्यानंतर खूप वेळा पोलीस चौकीतून काही गाड्या सापडल्या आहेत येऊन बघून जा असे निरोप यायचे. मीही नियमित जाऊन यायचे पण ती नाहीच सापडली. आजकाल एम एटी रस्त्यावर फारशा दिसत नाहीत पण एखादी खटारा दिसलीच तर अजूनही तिच्या नंबर प्लेट कडे लक्ष जातं. तुम्हालाही कधी दिसली तर सांगा. एमएच १२ – वाय ४१३३.

No comments:

Post a Comment