Sunday, August 23, 2015

वर्तन पत्रिका

मध्यंतरी आपली आवडती पुस्तके लिहायची फेसबुकवर पद्धत सुरु झाली. बऱ्याच कोणी कोणी मजेने विनोदी अंगाने आपापल्या चेक बुक बद्दल, पासबुक बद्दल आणखी कोणकोणत्या पुस्तकांबद्दल लिहिलं लिहिलं. मला ह्यावरून आमच्या शाळेतल्या वर्तन पत्रिकेची आठवण झाली. तेंव्हा ते एकूणच प्रकरण कितीही गंभीर असलं तरी त्या सगळ्याची आता खूप गंमत वाटते.

आमच्या शाळेत वर्ष सुरु झाल्या झाल्या एक तळहाताच्या आकाराहून मोठी अशी एक वर्तन पत्रिका दिली जायची. त्यामध्ये प्रत्येक महिन्याची वेगवेगळी पान असायची आणि त्यावर वाईट वर्तनाचे वेगवेगळे columns असायचे. म्हणजे शाळेत उशिरा आली, शिक्षिकांच ऐकत नाही, गणवेश नीट नव्हता, अभ्यास केला नाही, गप्पा मारताना आढळली, इतर बेशिस्त वर्तन ई. अशा वर्तन पत्रिकेवर त्या प्रकारचं गैरवर्तन झाल्यास त्या column खाली बाईंची सही व्हायची आणि त्याला त्याला ‘वर्तन पत्रिकेवर तारीख पडली’ असं म्हणणं प्रचुर होतं. ह्याचा अर्थ काहीतरी बेशिस्त वर्तन होणं शिक्कामोर्तब झालं. आणि अशा तीन तारखा पडल्या कि पुढच्या येणाऱ्या परीक्षेतून 1 मार्क वजा व्हायचा. एकतर मार्कांची अशी काही खैरात तर नसायची, त्यातून घरी काय सांगायचं हा प्रश्न असायचा आणि वर्षाच्या शेवटी कोणाच्या वर्तन पत्रिकेवर किती तारखा पडल्या हा एक प्रेस्टीज इश्यू असायचा.

अर्थात हे सगळं सुरवातीला पाचवी सहावी वगैरे. मग नंतर त्याची सवय होऊन गेली. आम्हालाही आणि घरच्यांनाही. सातवी आठवीतच ‘अक्ख्या वर्गाच्या वर्तन पत्रिकेवर सह्या पडल्या’ असा डिफेन्स कळला. मग नववीत घरी कोणी विचारेनासच झालं. आणि दहावीत आम्हीच कोणाला विचारेनासे झालो. बोर्डाच्या परीक्षेतून कोण मार्क वजा करणार आणि आता जी काही प्रेस्टीज कमवायची होती रादर घालवायची होती ती तर घालवलेलीच आहे म्हणून.

तेंव्हा शाळेत अ ते फ अशा गुणवत्तेनुसार तुकड्या असायच्या. (आजकाल काय छान छान नावं असतात डेझी आणि रोज वगैरे, असो.) आम्ही साधारण दर तीन वर्षांनी अ ब असा प्रवास करत क मध्ये स्थिरस्थावर झालेलो. साधारण शाळेमध्ये अ तुकडीतल्या विद्यार्थिनी बोलत असतील तर त्या discuss करत होत्या आणि क मधल्या बडबडत होत्या आणि फ मधल्या धिंगाणा घालत होत्या असा जवळपास सगळ्यांचा समज असल्याकारणाने आमच्या वर्तन पत्रिकेवर तारखाही तशाच प्रमाणात पडायच्या. अभ्यास अगदी रोज तपासला जायचा नाही त्यामुळे रोज केलाही जायचा नाही, नववी दहावीत दोन पोनी टेल्स किंवा वेण्या घालून जायला आवडायचं नाही, स्पोर्ट्स शूज वापरावेसे वाटायचे, मग कॅनवास शूज कोण घालणार, गप्पांच्या नादात सुट्टी संपायची बेल झाल्यावर पाणी प्यायला जायचो, धडाधड तारखा पडायच्या. ह्याउलट चुकून एक जरी तारीख पडली तरी अ वर्गातल्या मुली रडायला लागायच्या.

ह्याव्यतिरिक्त आमच्या कंपूच्या अशा काही खास तारखा पडायच्या. शाळा सुटल्यावर हातावर मेंदी काढत बसणे, हजार गाण्यांची लिस्ट असलेली वही सापडणे, FLAMES च्या चिठ्ठ्या सापडणे, लव पर्सेन्तेज च्या चिठ्ठ्या सापडणे, तास चालू असताना नाव गाव फळ फुल खेळणे, आमीर खानचे फोटो सापडणे, (तेंव्हा ५० पैशात असे फोटो विकत घ्यायचो, QSQt एकदम हॉट होता तेंव्हा ) परीक्षेच्या काळात शाळेत रंगपंचमी खेळणे.
एकदा मैत्रिणीच्या मित्राला शाळेच्या बाहेर रंग लावताना एका बाईंनी बघितलं. प्रकरण मुख्याध्यापिकांपर्यंत गेलं. ‘शाळेच्या गणवेशात अशा गोष्टी चालणार नाही’ असं ओरडून ओरडून सांगत असताना आमच्यापैकी कोणालातरी हसायला आलं. (म्हणजे सध्या ड्रेस मध्ये चालेल का ?) पालकांना बोलावण्याच्या ऐवजी आमचे केविलवाणे चेहेरे बघून त्याचा शेवट वर्तन पत्रिकेवर एकदम तीन तारखा पडण्यावर झाला. त्यावरही आम्ही हसलोच. दहावीचं वर्ष होतं ते. काय बिघडवू शकणार होत्या त्या !

एकदा असंच एक माजी मैत्रीण माझं फ्रेंड सर्कल कस मोठं आहे हे रंगवून रंगवून सांगायची. एकदा शाळा भरायच्या अगोदर फळ्यावर तिचं नाव मध्ये आणि तिच्या सगळ्या (boy ) फ्रेंड्स ची नावं सर्कलमध्ये काढली. वर्गात एकेक जणी येत गेल्या आणि मग फळा पुसायची हिम्मत झाली नाही. पुन्हा इतिहास रिपीट.

खूप आठवणी आहेत वर्तन पत्रिकेच्या. दहावीला ८०% मार्क मिळवून (१९९२ मध्ये ८०% खूप असायचे!) बाहेर पडलो. त्यामुळे ती वर्तन पत्रिका आम्हाला आता तेवढी भयानक नाही वाटत. परवा मुलीला सरप्राईज टेस्ट मध्ये ओउट ऑफ मार्क्स मिळाले आणि त्याच दिवशी वर्गाच्या खिडकीतून बाहेर स्क्विरल बघत होती (वर्गात लक्ष नव्हतं) म्हणून पनीश्मेंट ही झाली. मला कोण कौतुक वाटलं !!! माझं लहानपण पुन्हा एकदा तिच्यात बघता आलं

No comments:

Post a Comment